यशस्वी जीवनासाठी योग्य ध्येय निवडा

0

जळगाव। विद्यार्थ्यांना जर आपल्या जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर त्यांनी योग्य ध्येय निवळ केली पाहिजे आणि ते ध्येय पूर्ण करण्याची दुर्दम्य इच्छा शक्ती रुजवावी, असे प्रतिपादन प्रा. सुरेश पांडे यांनी केले. एसडी-सीड जळगाव यांच्यातर्फे मनेजमेंटच्या विद्यार्थ्यांसाठी ध्येय निश्‍चिती आणि ते संपादन करणे या कार्यशाळेचे आयोजन आय.एम.आर कॉलेज येथे करण्यात आले होते. त्याप्रसंगी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. कार्यक्रमाला आय.एम.आर कॉलेजच्या डॉ.सुभदा कुलकर्णी, प्रा. विशाल संदानशिव, एसडी सीड समन्वयक प्रवीण सोनवणे, व सर्व शिक्षक वृंद उपस्थित होते.

यशाच्या दिशेने पावलं टाकायला हवीत
पांडे पुढे बोलतांना म्हणाले की, आजचे विद्यार्थी मेहनती व हुशार आहेत. त्यांना ज्ञानाची प्रचंड लालसा आहे. विखुरलेल्या या सर्व गुणांना जर विद्यार्थ्यांनी एकत्र आणले व आपल्या स्वतःच्या मनाचे सामर्थ्य ओळखले आणि मजबूत मनशक्ती आणि निश्चित केलेली अचूक ध्येयप्राप्ती या दोन्ही बाबी विद्यार्थ्यांनी अंगीकारल्या तर त्यांना यशाच्या शिखराकडे नेण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही, असे त्यांनी सांगितले. प्रा पांडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना सांगितले कि, विद्यार्थ्यांनी ध्येयापर्यंत पोहचण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करायला हवेत. विद्यार्थी दशेतच ध्येय निश्चित करून आत्मविश्वासाच्या बळावर येणारे अडथळे दूर करून आपले ध्येय गाठायला हवे. जिद्द, आत्मविश्वास व चिकाटी या त्रिसूत्रीचा जीवनात सदैव वापर करून यशाच्या दिशेने पावलं टाकायला हवीत. चुकीच्या निर्णयाने अनेकदा जीवनाची दिशाच बदलून आयुष्य संपत असते. विद्यार्थ्यांनी स्वतःची कुवत ओळखूनच महत्वाकांक्षा बाळगून ती पूर्णत्वास नेण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करायला हवीत. हि कार्यशाळा यशस्वी होण्याकरिता कॉलेजच्या प्राचार्या सौ बेंडाळे व आय.एम.आर कॉलेजचे व्यवस्थापन यांच्या बद्दल एसडी-सीड गव्हार्निग बोर्ड चेअरमन डॉ. रेदासनी यांनी कृतज्ञता व्यक्त केली आहे.