यशस्वी होण्यासाठी वेळेचे नियोजन करणे आवश्यक

0

भुसावळ : प्रत्येक कार्य करण्याची एक ठराविक वेळ निश्‍चित असते. त्यामुळे जीवनात यशस्वी होण्यासाठी प्रत्येकाने वेळेचे नियोजन करणे आवश्यक असून ठरविलेले ध्येय गाठणे सहज शक्य होईल, असे प्रतिपादन उमवि विद्यार्थी कल्याण विभागाचे जिल्हा समन्वयक प्रा. नितीन बडगुजर यांनी केले.

येथील भोळे महाविद्यालयात उमवि विद्यार्थी कल्याण विभागांतर्गत युवती सभेमार्फत महिला व्यक्तिमत्व विकास कार्यशाळा घेण्यात आली. याप्रसंगी प्रा. बडगुजर बोलत होते. त्यांच्या हस्ते कार्यशाळेचे उद्घाटन करण्यात आले. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. आर.पी. फालक होते. तसेच डॉ. आर.बी. ढाके, प्रा.डॉ. शोभा चौधरी, प्रा. व.पू. होले उपस्थित होते.

विविध विषयांवर मार्गदर्शन
या कार्यशाळेत प्रा. व.पू. होले यांनी महिलांच्या सामाजिक समस्या, अ‍ॅड. अशोक महाजन यांनी कायदेविषयक ज्ञान, डॉ. दिपक जावळे यांनी महिलांच्या आरोग्याविषयी मार्गदर्शन केले. सुत्रसंचालन रचना इंगळे, प्रास्ताविक प्रा. शोभा चौधरी यांनी तर आभार प्रा. माधुरी पाटील यांनी मानले. यशस्वीतेसाठी प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांनी परिश्रम घेतले.