यशाच्या प्रवाहात सामील होण्यासाठी प्रबळ इच्छाशक्ती आवश्यक!

0

जळगाव । आजच्या युवक-युवतींना कोणत्याही क्षेत्रात यशाच्या प्रवाहात सामील व्हायचे असेल तर त्यासाठी त्यांच्याजवळ प्रबळ इच्छाशक्ती असणे आवश्यक आहे असे प्रतिपादन बालविकास प्रकल्प अधिकारी वैशाली दाभाडे यांनी केले. जळगाव येथील दर्जी फाऊंडेशनतर्फे युपीएससी, एमपीएससी या परीक्षांमध्ये टॉपर्स ठरलेल्या यशस्वीतांच्या चर्चासत्र व अनुभव कथन कार्यक्रमातील उपस्थितांसमोर ते बोलत होते. प्रमुख अतिथी म्हणून महानगरपालिकेचे उपायुक्त लक्ष्मीकांत कहार, माजी न्यायाधिश बी.के. शिंदे, उद्योजक श्रीराम पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

विद्यार्थ्यांसह पालकांनाही केले मार्गदर्शन
10 वी व 12 वी ची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांनी या शिक्षणानंतर करीअरचा कोणता राजमार्ग निवडावा यासाठी एकदिवशीय मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन दर्जी फाऊंडेशनतर्फे करण्यात आलेले होते. पाल्याला करीअरची योग्य दिशा मिळावी यासाठी युपीएससी व एमपीएससी परीक्षांमध्ये अव्वल क्रमांकाने उत्तीर्ण ठरलेल्या यशस्वीतांना या मार्गदर्शनासाठी आमंत्रित करण्यात आलेले होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून युपीएससीची असिस्टंट कमांडंट परीक्षा ऑल इंडिया रँक-32 ने उत्तीर्ण केलेले अभ्युदय साळुंखे हे उपस्थित होते.

ध्येय प्राप्त करण्यासाठी मेहनत करा
प्रशासकीय नोकरी मिळावी अशी प्रत्येकाची इच्छा असते परंतू ध्येय ठरविले तर या अंतिम ध्येयापर्यंत पोहचण्यासाठी तेवढीच मेहनत घेणे गरजेचे असते. क्षेत्र कोणते निवडले हे महत्वाचे नसून अंतिम यशापर्यंत पोहचण्यासाठी प्रबळ इच्छाशक्ती असणे अत्यंत आवश्यक असते असे मत बालविकास प्रकल्प अधिकारी वैशाली दाभाडे यांनी व्यक्त केले. युपीएससी सारख्या परीक्षेत खान्देशातील युवकही यशस्वी कसे होतील याबाबत अभ्युदय साळुंखे यांनी मार्गदर्शन केले.

15 मे पासून नवीन बॅच
प्रास्ताविकात गोपाल दर्जी यांनी 10 वी, 12 वी च्या विद्यार्थी व पालकांना योग्य करीअरच्या बाबतीत सविस्तर माहिती दिली. आतापासुनच युपीएससी, एमपीएससी परीक्षांची तयारी करणे गरजेचे आहे. आयसीडीसी सारख्या बॅचेसमधुन विद्यार्थ्यांच्या करीअरला योग्य दिशा देण्याचा प्रयत्न आम्ही करीत2 आहोत. 15 मे पासून नवीन आयसीडीसी बॅचेस सुरु करीत असून विद्यार्थी व पालकांनी अशा बॅचेसमधून मार्गदर्शन घेऊन यशस्वी व्हावे असे मत त्यांनी व्यक्त केले. सूत्रसंचालन संदीप पाटील यांनी व आभारप्रदर्शन रामकृष्ण करंके यांनी केले.