‘यस माय डिअर’ : मानवाची सुखासाठीची धडपड

0

प्रत्येकाच्या मनांत एक स्वप्न असतं आणि ते स्वप्न साकार होण्यासाठी ती व्यक्ती रात्रंदिवस धडपड करत असते, आपल्याला कोणत्याही कारणाने किंवा येन केन प्रकारेन कसेही करून ती गोष्ट साध्य करायची असते आणि जगण्यासाठी तो काहीही करायला तयार होतो, हीच मध्यवर्ती कल्पना मनांत धरून लोकप्रिय नाट्यसंस्था नाट्य मंदार या संस्थेने ‘यस माय डिअर’ हे नाटक निर्माते मंदार राजाराम शिंदे यांनी सादर केलं आहे. लेखन आणि दिग्दर्शन श्रीनिवास नार्वेकर यांचे असून नेपथ्य बाबा पार्सेकर यांनी तयार केले आहे. प्रकाश योजना सचिन यांची असून वेशभूषेची जबाबदारी मिताली शिंदे यांनी सांभाळलेली आहे. संगीत कौशल इनामदार यांनी दिले आहे. या नाटकात समीर दळवी, सुमुखी पेंडसे, विजय मिश्रा या कलाकारांनी आपापल्या भूमिकेला योग्य तो न्याय दिलेला आहे.‘यस माय डिअर’ हे नाटक म्हणजे कौटुंबिक रस्सीखेच असून ह्या मध्ये निहार विश्‍वास, सानिया विश्‍वासची कथा मांडलेली असली तरी या कथेमध्ये विश्‍वनाथ अवस्थी नावाची व्यक्ती प्रवेश करते आणि सारे चित्रच बदलून जाते.

निहार विश्‍वास हा एक नावाजलेला कमर्शियल आर्टिस्ट आहे. आपल्या मेहनतीने त्याने विविध कंपनीच्या प्रोजेक्टवर काम केलेले असून त्यामध्ये त्याने नाव मिळवलेले आहे. मिळणार्‍या मानधनावर तो खूश आहे. असे जीवन जगत असताना एक दिवस त्याच्या चित्रकलेवर खूश होऊन सानिया नावाची मुलगी निहारच्या आयुष्यात प्रवेश करते, पुढे ती निहार बरोबर लग्न करते आणि सानिया निहार या नावाने ओळखली जाते. सानिया ही एका मोठ्यया आर्ट गॅलरीची मालकीण आहे, ती स्वतः एक उत्तम कमर्शियल आर्टिस्ट असून तिचेही खूप मोठे नाव आहे. निहारसाठी ती प्रयत्न करून विविध प्रोजेक्ट त्याला मिळवून देते आणि मग ते दोघे आता एका मोठ्या आलिशान घरात राहत असतात. दोघांचे एकमेकांवर खूप प्रेम आहे, एक दिवस त्यांच्या घरांतील फोन वाजतो पण पलीकडून बोलणारी व्यक्ती ही शालनच्या नावाचा उल्लेख करते आणि ती व्यक्ती त्यांच्या आयुष्यात प्रवेश करते, त्या व्यक्तीचे नाव असते विश्‍वनाथ अवस्थी.

विश्‍वनाथ अवस्थी हा एक मोठा बिझनेसमन असून, त्याने अनेक वेळा विविध ठिकाणी चित्रकलेची प्रदर्शने भरवलेली असतात, त्याच्या एका प्रदर्शनात त्याची शालन नावाच्या मुलीबरोबर ओळख होते, शालनलासुद्धा खूप मोठं होण्यासाठी एका मोठ्या पैसेवाल्या व्यक्तीच्या आधाराची गरज असते, पण आता शालन विश्‍वनाथबरोबर नसते, त्या शालनचा शोध घेण्यासाठी विश्‍वनाथ फिरत असतो, आणि शालन त्याला सानियाच्या रूपात दिसते. विश्‍वनाथने शालनबरोबर लग्न केलेलं असते, पण शालनने त्याला सोडून निहार बरोबर नातं जोडलेलं असते, निहार विश्‍वासचीसुद्धा मोठी स्वप्न असतात, आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी तो सानियाची मदत घेत असतो. सानियासुद्धा हे जाणून असते. पण अचानक विश्‍वनाथ अवस्थी त्यांच्या घरी येतो त्यावेळी सगळंच बदलून जाते. एकमेकांच्या नात्यांमधील गुंतागुंत वाढत जाते. विश्‍वनाथ अवस्थी सानियाला ओळखतो आणि सानिया विश्‍वनाथला पक्की ओळखून असते.

निहार विश्‍वास हा सानियाचा दुसरा नवरा असतो. सानियाचे विश्‍वनाथबरोबर शालन म्हणून लग्न झालेले असते, पण त्यांचा घटस्फोट झालेला नसतो, ही नात्यांमधील गुंतागुंत एका विशिष्ट कारणासाठी प्रत्येकानी एकमेकांशी जोडलेली असते, कारण प्रत्येकाला काही ना काही मिळवून जगायचं असते इथं प्रत्येकजण एकमेकांचा माय डिअर असतो, हा कळत न कळत निर्माण झालेला नात्यांमधील गुंता कसा सुटतो, ते मात्र तुम्हाला नाटक पाहूनच समजू शकेल.एकमेकांच्या नात्यांमध्ये गुंतत जाणारे रहस्यमय धागे लेखकांनी विणलेले आहेत, कारण प्रत्येक व्यक्तीला मोठं व्हायचं आहे, त्यासाठी ते आपल्यापेक्षा लहान असलेल्या व्यक्तीला बळीचा बकरा बनवत असतात. निहार-सानिया – विश्‍वनाथ यांच्या पूर्वीच्या आयुष्यात काही ना काही घडलेले असते, प्रत्येकाला आपले उद्दिष्ट साध्य करायचे आहे, नाव, पैसा, आणि सारे काही प्रत्येकालाच हवे आहे, प्रत्येक व्यक्तिरेखेची पार्श्‍वभूमी वेगवेगळी जरी असली, तरी ते एकमेकांच्या एका नाजूक धाग्याने बांधले गेलेले आहेत.

सानिया ची भूमिका सुमुखी पेंडसे यांनी आणि निहार विश्‍वासची भूमिका समीर दळवी यांनी छान पद्धतीने रंगवलेली आहे. दोघांच्या आयुष्यातील घटनांच्या विविध छटा त्यांनी उत्तमपणे साकारलेल्या आहेत. विश्‍वनाथ अवस्थी ही एक वेगळी व्यक्तिरेखा विजय मिश्रा यांनी खूप छान पद्धतीने रंगवलेली आहे. प्रेम, राग, लोभ आणि महत्त्वाकांक्षा अशा अनेक छटा त्यांनी दाखवल्या आहेत. नेपथ्य/प्रकाश योजना/संगीत हे नाटकाला पूरक असेच आहे. हे नाटक प्रेक्षकांना एक वेगळेच समाधान देते.

व्यक्ती जीवनावर आधारित कथानक
जीवनातील स्वप्न साकार होण्यासाठी व्यक्ती रात्रंदिवस धडपड करत असते. आपल्याला कोणत्याही कारणाने किंवा येनकेन प्रकारेन कसेही करून ती गोष्ट साध्य करायची असते आणि जगण्यासाठी तो काहीही करायला तयार होतो, हीच मध्यवर्ती कल्पना मनांत धरून लोकप्रिय नाट्यसंस्था नाट्य मंदार या संस्थेने ‘यस माय डिअर’ हे नाटक निर्माते मंदार राजाराम शिंदे यांनी सादर केले आहे. लेखन आणि दिग्दर्शन श्रीनिवास नार्वेकर यांचे असून नेपथ्य बाबा पार्सेकर यांनी तयार केले आहे.

– दीनानाथ घारपुरे
मनोरंजन प्रतिनिधी
9930112997