जळगाव : पंतप्रधान कार्यालयासह पाच शहरांमध्ये हल्ला करण्याच्या धमकीची पोस्ट बुधवारी, फेसबुकवर व्हायरल झाली होती. या पार्श्वभूमीवर वखार महामंडळ येथे मतमोजणीच्या ठिकाणी ‘यहा तो परिंदा भी पर नही मार सकता’, अशा प्रकारे कडेकोट बंदोबस्त लावण्यात आला होता.
प्रत्येकाची तपासणी
मतमोजणीच्या ठिकाणी प्रवेश करण्यापासून ते थेट मतमोजणी सुरु असलेल्या ठिकाणी जाताना थोड्या थोड्या अंतरावर मशिनव्दारे प्रत्येकाची तपासणी केली जात होती.
सकाळपासून पुढारी, कार्यकर्त्यांची गर्दी
जळगाव शहरात एकीकडे उन्हाचा तडाखा बसत असताना दुसरीकडे मतमोजणीसाठी जिल्हा परिषद सदस्य, विविध पक्षांच्या कार्यकर्त्यांनी वखार महामंडळ परिसरात गर्दी गेली होती. मतमोजणीच्या ठिकाणी मधूनच कुलर व पंखे बंद पडत असल्याने या व्यवस्थेची जबाबदारी असलेल्या कर्मचार्याची वरिष्ठ अधिकार्याने झाडाझडती घेतली.
पहिल्या फेरीपासून भाजप उमेदवारांची आघाडी
सकाळी 8 वाजता टपाली मतदानापासून मतमोजणीला सुरुवात झाली. विधानसभा मतदारसंघनिहाय प्रत्येकी 14 टेबलांवर मतमोजणी होत होती. पहिल्या फेरीअखेर उन्मेश पाटील यांना 29 हजार 927 तर राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार गुलाबराव देवकर 11 हजार 411 मते पडली होती. सुरुवातीपासूनच 18 हजारांचा लीड उन्मेश पाटील यांनी घेतला.
रावेर मतदारसंघात भाजपाच्या उमेदवार रक्षा खडसे यांनीही पहिल्या फेरीपासून आघाडी घेतली. पहिल्या फेरीत त्यांना 25,398 तर काँग्रसचे डॉ.उल्हास पाटील यांना 15, 098 मते मिळाली. रक्षा खडसे यांना सुमारे 10 हजाराचा लीड होता.