पुणे : व्हॉट्स अॅप, फेसबुक या गोष्टींकडे व्यसन म्हणून बघितले जाते. मोबाईल हे व्यसन म्हटले जाते. परंतु नवीन गोष्ट आपल्या हातात येते तेव्हा जुने आपोआप मागे पडते. मला हवी ती माहिती, हव्या त्या माध्यमातून, हवी तेव्हा, हवी तिथे मिळाली पाहिजे, ही सध्याच्या काळाची गरज आहे. सध्याच्या काळात माध्यम साक्षरतेचे किमान ज्ञान असणे आवश्यक आहे. त्यामुळे यापुढील काळात माध्यम साक्षरता महत्त्वाची आहे, असे मत पुणे आकाशवाणी केंद्राचे उपसंचालक नितीन केळकर यांनी व्यक्त केले.
नॅशनल युनियन ऑफ जर्नालिस्ट, महाराष्ट्र आणि एस. एस. प्रोफेशनल कॅम्पस, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने सिंहगड रस्त्यावरील एस. एस. प्रोफेशनल कॅम्पस येथे डिजीटल मीडिया कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेचे उद्घाटन केळकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी एस. एस. प्रोफेशनल कॅम्पसचे शिशिर पुराणिक, नॅशनल युनियन ऑफ जर्नालिस्ट महाराष्ट्रच्या अध्यक्षा शीतल करदेकर, शिल्पा देशपांडे, सचिन चपळगावकर, अभिजीत टिळक, रायचंद शिंदे, जितेंद्र जाधव, श्रीकांत काकतीकर उपस्थित होते.
काळाबरोबर अपडेट रहा
भविष्यात अशा अनेक कार्यशाळांचे आयोजन करण्यात येणार आहे. अशा कार्यशाळांमधून सोशल मीडियाचा वापर कशाप्रकारे करावा हे समजू शकेल. या कार्यशाळेसाठी विविध भागातील 30 प्रशिक्षणार्थिंनी सहभाग घेतला होता, अशी माहिती शिशिर पुराणिक यांनी दिली. काळ बदलत आहे त्याप्रमाणे अनेक गोष्टींमध्ये बदल घडत आहे. तसेच मीडियामध्ये देखील बदल घडत आहेत. काळाबरोबर अपडेट रहावे यासाठी या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते, असे शिल्पा देशपांडे यांनी सांगितले.
दृकश्राव्य माध्यमाविषयी मार्गदर्शन
दुसर्या सत्रात आजची शिक्षणपद्धती विषयावरील परिसंवाद घेण्यात आला. यात डॉ. शिशिर पुराणिक, अर्चना मवाळ, शीतल करदेकर यांनी सहभाग घेतला. पत्रकारितेतील आव्हाने विषयावर सचिन चपळगावकर, रायचंद शिंदे, जितेंद्र जाधव, श्रीकांत काकतिकर यांनी आपले मत व्यक्त केले.