नवी दिल्ली । 52 हजार कोटींपेक्षा जास्त कर्जाच्या बोजाने बुडत चाललेल्या एअर इंडियाने आपल्या खर्चात कपात करण्यासाठी आंतरराष्ट्रीय विमान उड्डाणातील जेवणातून सॅलड बंद करण्याची आणि मासिके कमी करण्याची शक्कल लढवली आहे. एअर इंडियाला ही कल्पना त्यांच्या आंतरराष्ट्रीय फ्लाइटमधील एका केबिन क्रूने सुचवल्याचे एअर इंडियाच्या एका वरिष्ठ अधिकार्याने आपल्या वरिष्ठ व्यवस्थापकांना केलेल्या अंतर्गत मेलमध्ये लिहिले आहे. ते सांगतात, ”केबिन क्रूच्या निरीक्षणानुसार, आंतरराष्ट्रीय फ्लाइटच्या इकॉनॉमी क्लासमध्ये केवळ 20% प्रवासीच जेवणात दिलेले सॅलड खातात. त्यामुळे सॅलड देणे बंद केले जाऊ शकते तसेच विमानात प्रत्येक प्रवाशाला एअर इंडियाच्या ’शुभ यात्रा’ मासिकाची एकेक प्रत देण्याऐवजी केवळ 25 प्रतीच मासिक रॅकमध्ये ठेवल्या गेल्या तर त्यामुळे विमानातील वजन कमी केले जाऊ शकते. वजन कमी झाल्यास इंधनाचीही बचत होऊ शकते.”
एअर इंडियाचे कर्मचार्यांना बचतीचे आवाहन
इंडिगोने फ्लाइटमधील वजन कमी करण्यासाठी प्रथम कॉकपीट डोअरसमोरील पडदे आणि नंतर पडद्यांचे हूक्सही काढून टाकले. 1980 साली तर एका अमेरिकन कॅरिअरने आपल्या प्रत्येक जेवणातून ऑलिव्ह काढून टाकत साधारण 1 लाख डॉलर्सची बचत केली होती. एअर इंडियाच्या प्रत्येक विभागाने एअरलाइन्सचा महसूल वाढवण्यासाठी आणि खर्चात कपात करण्यासाठी युद्ध पातळीवर अशा प्रकारे प्रयत्न करण्याचे आवाहन कंपनीच्या कर्मचार्यांना केले आहे. तरंच ही लढाई आपण एकत्रितपणे जिंकू शकतो, असा आशावादही व्यक्त केला आहे.
मालमत्ता विकण्याची सूचना
’महाराजा’ला वाचवण्यासाठी एअर इंडियाचे वरिष्ठ वैमानिक सुभाषिश मजुमदार यांनीदेखील सुचनांचे एक पत्र विमान वाहतूक मंत्रालय आणि व्यवस्थापनाला लिहिले आहे. ते सुचवतात की, कर्जाचा बोजा कमी करण्यासाठी कंपनी आपली एआय ग्राऊंड हॅण्डलिंगमधील भागभांडवल, इंजिनिअरिंग सब्सिडियरीज, एआय एक्सप्रेस, अलायंस एअर आदी मालमत्ता विकू शकते. महत्त्वाच्या सेवांमध्ये सुधारणा केली पाहिजे.