यावर्षी ‘चेतक फेस्टिवल’चा निधी रोखणार- रावसाहेब दानवे

1

नंदुरबार। जिल्ह्यातील दुष्काळ स्थिती पाहता यावर्षी सारंखेडा यात्रेतील चेतक फेस्टिवलसाठी दिला जाणारा निधी रोखला जाईल, अशी माहिती भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी दिली. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नंदुरबार लोकसभा मतदार संघाचा आढावा घेण्यासाठी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे हे आज रविवारी नंदुरबार जिल्हा दौऱ्यावर आले होते. यावेळी पत्रकारपरिषदेत त्यांनी ही माहिती दिली.

शासकीय विश्रामगृहावर घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत एका प्रश्नाला उत्तर देताना प्रदेशाध्यक्ष दानवे यांनी वरील माहिती दिली. यावेळी व्यासपीठावर पर्यटनमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल, खासदार डॉ.हिना गावित, आमदार डॉ.विजयकुमार गावित, भाजपा ओबीसी प्रदेशाध्यक्ष विजय चौधरी उपस्थित होते.

यावेळी दानवे म्हणाले की परंपरा टिकवण्यासाठी लोकवर्गणीतून यात्रा महोत्सव भरविला जात असेल तर हरकत नाही, परंतु चेतक फेस्टिवल सारख्या महोत्सवाला दुष्काळी स्थितीमुळे निधी दिला जाणार नाही ,तशी सूचना आपण संबंधित विभागाला देणार आहोत असे ते म्हणाले,नंदुरबार जिल्ह्यात दुष्काळ जाहीर झाला आहे, अशा परिस्थितीत शासनाच्या निधीतून चेतक फेस्टिवल मध्ये घोडे नाचविणे उचित राहणार नाही असाच संदेश जणू रावसाहेब दानवे यांनी दिला आहे.

पत्रकार परिषदेत चेतक फेस्टिवलचा प्रश्न उपस्थित होताच पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांच्या चेहऱ्यावर संतप्त भावना दिसून आली, या भावनेच्या भरात त्यांनी तुमच्या मागणीनुसार सारंगखेडा यात्राच रद्द करून टाकू असा उपरोधिक सवाल उपस्थित केला होता,चेतक फेस्टिव्हल साठी दर वर्षी कोट्यवधी रुपयांचा निधी दिला जातो, मात्र या निधीच्या खर्चाबाबत देखील संशय असल्याने बहुचर्चित निधीचा प्रश्न उपस्थित करण्यात आला होता.