ऑनरकिलींगची शक्यता कमीच ; तरुणीच्या कुटुंबियांचे पोलिसांनी नोंदवले जवाब
यावल- शहरातील 22 वर्षीय घटस्फोटीतेचा ऑनरकिलिंगच्या संशयातून कुटुंबियांनीच खून केल्याची तक्रार प्रियकराने केल्यानंतर पोलिसांनी या घटनेचा चौफेर तपास सुरू केला आहे. पोलिसांनी तरुणीच्या कुटुंबियांचे जवाब नोंदवले असून तरुणीचा मृत्यू आजारपणामुळे झाल्याची बाब पुढे आली असून ऑनर किलींगची शक्यता कमीच असल्याचे पोलिस सूत्रांकडून समजते मात्र तरीही पोलिस सर्व शक्यता पडताळून याबाबत निष्कर्ष काढणार आहेत.
प्रियकराच्या तक्रारीनंतर खळबळ
22 वर्षीय घटस्फोटीत तरुणीचा गुरुवारी मृत्यू झाल्यानंतर सायंकाळी कुटुंबियांनी तिच्यावर अंत्यसंस्कार केले मात्र तरुणीचा मृत्यू संशयास्पद असून ती गर्भपती असल्याचा दावा तरुणीच्या प्रियकराने करीत पोलिसांकडे याबाबत चौकशीची मागणी केल्याने शहरात खळबळ उडाली होती. शनिवारी रात्री उपविभागीय पोलिस अधिकारी राजेंद्र रायसिंग यांनी यावल पोलिस ठाण्यात मयत तरुणीच्या कुटुबियांची सखोल चौकशी केली तर विविध बाजुने पोलिस निरीक्षक डी. के. परदेशी, उपनिरीक्षक सुनिता कोळपकर, उपनिरीक्षक दीपक ढोमणे यांनी रात्री उशीरा पर्यंत मयत तरूणीच्या कुटुंबीयाची, ‘त्या’ तक्रारदार तरूणाची चौकशी केली मात्र ठोस असे काही निष्पन्न झालेले नाही. पोलिस उपअधीक्षक राजेंद्र रायसिंग व पोलिस निरीक्षक दत्तात्रय परदेशी यांनी या प्रकरणाबाबत सखोल चौकशी सुरू असल्याचे सांगितले.