यावलमध्ये अवैध वाळू वाहतूक करणारे डंपर जप्त : दोघांविरोधात गुन्हा

यावल : तालुक्यातील किनगाव-यावल रस्त्यावर अवैधरीरत्या वाळूची चोरटी वाहतूक करणार्‍या डंपरवर फैजपूर उपविभागीय पोलीस कार्यालयाच्या पथकाने कारवाई करून डंपर ताब्यात घेत डंपरचालकासह मालकावर गुन्हा दाखल केला. फैजपूर विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.कुणाल सोनवणे यांच्या नेतृत्वातील सहाय्यक फौजदार शरद शिंदे, पोलीस नाईक अल्ताफ अली आणि पोलीस कॉन्स्टेबल सुमित बाविस्कर यांच्या पथकाने सोमवार, 21 फेब्रुवारी रोजी पहाटे चार वाजेच्या सुमारास यावल शहराजवळील फॉरेस्ट नाक्याजवळ ही कारवाई केली. अवैधरीत्या वाळूने भरलेले डंपर यावल पोलीस ठाण्यात जमा करण्यात आले. या प्रकरणी पोलिस हेड कॉन्स्टेबल सुमित बाविस्कर यांच्या फिर्यादीवरून डंपर चालक गणेश गंगाराम सोनवणे (32, रा.ममुराबाद, ता.जि.जळगाव) आणि डंपर मालक संदीप आधार साळुंखे (रा.कोळन्हावी, ता.यावल) या दोघांविरोधात यावल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस हेड कॉन्स्टेबल नितीन चव्हाण करीत आहे.