यावल- चिमुकले खेळत असतानाच अचानक उभे असलेले ट्रॅक्टर पुढे आल्याने चिमुकल्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना मंगळवारी दुपारी साडेचार वाजता घडली. या घटनेत शिवलाल बुधा बारेला या नऊ वर्षीय बालकाचा करुण अंत झाला. शहरातील फैजपूर मार्गावरील आदिवासी वस्तीत घराच्या अंगणात शिवलालसह काही मुले खेळत होती तर उभे असलेले एक ट्रॅक्टर अचानक पुढे आल्याने चाकाखाली दबले गेल्याने शिवलालचा मृत्यू झाला. हरिओम नगरच्या शेजारी माजी नगरसेवक देवराम राणे यांच्या शेताजवळ मंगळवारी दुपारी ही घटना घडली. दरम्यान, घटनेनंतर गंभीर अवस्थेत शिवलालला ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले परंतु डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. दरम्यान, ट्रॅक्टरखाली आल्याने बालकाचा मृत्यू झाल्याचे सांगितले जात असलेतरी ट्रॅक्टरमध्ये काही मुले खेळत होती व खेळताना शिवलाल डोक्यावर पडला असावा, अशीदेखील चर्चा आहे. कुटुंबियांनी तक्रार न दिल्याने गुन्हा दाखल झाला नसल्याचे सूत्रांनी सांगितले.