यावल : धार्मिक तेढ निर्माण होईल, अशा शब्दात डिवचून एका तरुणास मारहाण करीत शिवीगाळ केल्याप्रकरणी महिलेसह अन्य सात जणांविरुद्ध यावल पोलिसात दंगल व मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेमुळे शहरातील खिर्णीपुरा परीसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
दोन समाजात तेढ निर्माण करीत तरुणास मारहाण
यावल शहरातील संभाजी पेठमध्ये सकाळी साडेदहाच्या सुमारास एक युवक भाजीपाला घेण्यास गेला असता त्यास आकाश सुधाकर हिवरकर या तरूणाने आक्षेपार्ह भाषा वापरून दोन समाजात तेढ निर्माण होईल, असा संवाद साधला तर त्यानंतर आरोपी आकाशसह सागर हिवरकर, विशाल हिवरकर, गौरव संतोष भोई, वैभव सदाशिव सोनवणे, रोहित विनोद जाधव व एका महिलेने या युवकास तराजुच्या लोखंडी वजनाने डोक्यात मारून दुखापत केली. या घटनेत तरुण गंभीर जखमी झाला. यावलचे पोलिस निरीक्षक अरुण धनवडे व सहकार्यांना घटनेची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी धाव घेत संंशयीत आरोपींना ताब्यात घेतले. याबाबत एका महिलेसह सात जणांविरुद्ध यावल पोलिस ठाण्यात 307, 343, 337, 109, 323, 143, 147, 148, 149, 504 सह मु. पोे. का. 135, प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सहाय्यक फौजदार नेताजी वंजारी करीत आहेत.