यावल : कोरेगाव भिमा प्रकरणाचे पडसाद यावलसह तालुक्यात उमटले. तालुक्यातील सांगवी, डोंगरकठोरा फाटा अशा ठिकाणी तब्बल पाच एस.टी. बसेसच्या काचा फोडण्यात आल्या तर शहरातील साने गुरूजी विद्यालयाच्या स्नेहसंमेलनात तोडफोड करून जमावाने मंडपाची नासधूस करीत एका विद्यार्थ्याला मारहाण केली तसेच भुसावळ टी पॉईंटवर जमावाने जाळपोळ केली. भिमा कोरगाव प्रकरणाचा निषेध म्हणून यावल शहरात बुधवारी कडकडीत बंद पाळण्यात आला. सकाळी नऊ वाजेला बांधवांनी रस्त्यावर उतरत व्यवसायीकांना बंदचे आवाहन केले. कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय बंद करण्यात आले तर नगरपालिका संचलित साने गुरूजी विद्यालयात बुधवारी स्नेहसंमेलन होते. 11 वाजेला आंदोलकांचा ताफा तेथे पोहोचला व स्नेहसंमेलन उधळून लावले तर काहींनी मंडपाची नासधूस केली.
ग्रामीण भागात हिंसक वळण
ग्रामीण भागात सांगवी बुद्रुक येथे बंद दरम्यान रस्त्यावरून जाणार्या एसटी बसेसवर आंदोलकांनी हल्ला चढवला. त्यात यावल आगाराच्या पाच एसटी बसेस तर एक रावेर आगाराची बस अशा एकूण सहा एसटी बसेस फोडण्यात आल्या. सकाळी 9 ते 10 या वेळेत या घटना घडल्या तर सर्तकता म्हणून 10 वाजेपासून यावल आगार बंद करण्यात आल व येथे मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला.
प्रवाशांचे झाले हाल…
गोर गरीब ग्रामीण भागातील प्रवाशांचे या दरम्यान मोठे हाल झाले. दुकाने बंद व एसटी बंद सेवा बंद असल्याने प्रवाशांच्या अडचणी वाढल्या संपूर्ण शहरात पोलिस निरीक्षक डी. के. परदेशी, सहाय्यक पोलिस निरीक्षक योगेश तांदळे, उपनिरीक्षक सुनीता कोळपकर सह पोलिस व होमगार्ड पथकांनी गावात चोख बंदोबस्त ठेवला.