यावलमध्ये राजकारण तापले ; अपात्र नगरसेवकांना दिलासा न मिळण्यासाठी कॅव्हेट

0

सत्ताधारी आणि विरोधी गट मुंबईत तळ ठोकून ; राज्यमंत्र्यांच्या निर्णयाकडे लागले लक्ष

यावल- व्हीप झुगारल्या प्रकरणी अपात्र झालेल्या दोन्ही नगरसेवकांना दिलासा न मिळाण्यासाठी शुक्रवारी नगरविकास राज्यमंत्री रणजीत पाटील यांच्याकडे तक्रारदार दोन्ही गटाकडून कॅव्हेट दाखल करण्यात आल्याने यावल शहरातील राजकारणात चांगलीच खळबळ उडाली आहे दुसरीकडे दोन्ही अपात्र नगरसेवकांना जिल्हाधिकार्‍यांच्या निर्णयाविरुद्ध राज्यमंत्र्यांकडे अद्याप अपिल दाखल करण्यास यश मिळाले नसल्याचे सांगण्यात आले. दोन्ही गटातील नगरसेवक मुंबईत ठाण मांडून असल्याने राज्यमंत्री या प्रकरणात नेमकी काय भूमिका घेतात ? याकडे लक्ष लागले आहे.

दोन्ही गटातर्फे राज्यमंत्र्यांकडे कॅव्हेट
पालिकेतील विषय समिती निवडीप्रसंगी गटनेत्यांचा व्हीप झुगारल्याप्रकरणी जिल्हाधिकार्‍यांनी नगरसेवक सुधाकर धनगर व रेखा युवराज चौधरी यांना 10 ऑक्टोबरला अपात्र केले होते. शुक्रवारी या निर्णयाला स्थगिती मिळवण्यात दोघांना अपयश आले आहे. कारण जिल्हाधिकार्‍यांच्या निर्णयाविरोधात अपिल तसेच दिलेल्या निर्णयावर स्थगिती मिळवण्यासाठी दोघांकडून शुक्रवारी नगरविकास राज्यमंत्र्यांकडे अपिल दाखल होणे अपेक्षित होत. मात्र तसे झाले नाही. गटनेते अतुल पाटील व महर्षी व्यास शविआचे गटनेते राकेश कोलते या दोघांनी शुक्रवारीच कॅव्हेट दाखल केले. दोघा नगरसेवकांकडून सोमवारी जिल्हाधिकार्‍यांच्या निर्णयाला आव्हान देण्यासाठी नगरविकास मंत्रालयात अपिल दाखल केले जाण्याची शक्यता उपनगराध्यक्ष प्रा. मुकेश येवले यांनी व्यक्त केली. सत्ताधारी व विरोधी गटातील अनेक नगरसेवक मुंबईत तळ ठोकून असून राज्यमंत्र्यांच्या निर्णयाकडे लक्ष लागले आहे.