काँग्रेसकडे संख्याबळ असताना नामुष्की ; ऐनवेळी उमेदवार बदलाच्या खेळीने आश्चर्य
यावल- पालिकेच्या उपनगराध्यक्षपदावर वर्णी लागण्यासाठी अत्यंत चुरशीच्या झालेल्या निवडणुकीत महर्षी व्यास आघाडीचे गटनेते राकेश मुरलीधर कोलते यांनी बाजी मारत सत्ताधारी गटाला हादरा दिला. मंगळवारी पालिका सभागृहात झालेल्या विशेष सभेत कोलते यांच्या बाजूने नऊ तर काँग्रेसने ऐनवेळी दिलेल्या उमेदवार शेख सईदाबी हारून यांना आठ मते मिळाल्याने कोलते यांची उपनगराध्यक्षपदी निवड झाल्याचे पीठासीन अधिकारी तहसीलदार कुंदन हिरे यांनी जाहीर केले. निवड प्रक्रियेत विरोधी गटाने पुन्हा एकदा सत्तारूढ गटावर मात करून पालिकेत विषय समिती सभापती सह उपनगराध्यक्ष पदाचे रूपात आपले वर्चस्व सिद्ध केले आहे.
काँग्रेसने ऐनवेळी उमेदवार बदलला
उपनगराध्यक्षपदासाठी मंगळवारी महर्षी विकास महर्षी व्यास आघाडीचे गटनेते राकेश कोलते यांच्यासह काँग्रेसतर्फे ऐनवेळी उमेदवारी जाहीर झालेल्या शेख साईदाबी हरून यांचा उमेदवारी अर्ज दाखल झाला. काँग्रेसने शेख असलम शेख नबी यांच्या नावाचा व्हीप काढून त्यांना उपनगराध्यक्ष पदाचा उमेदवार घोषित केले होते तर सदस्यांना शेख असलम नबी यांना मतदान करण्याचे पक्षादेशातही बजावण्यात आले मात्र शेख असलम नबी हे 14 जानेवारीपासूनच शहरात नसल्यामुळे काँग्रेस ऐनवेळी शेख सईदाबी हारुन यांची उमेदवारी दाखल केली. उपनगराध्यक्षपदासाठी राकेश कोलते व शेख सईदाबी हरून असे दोन अर्ज प्राप्त झाल्यामुळे पीठासीन अधिकारी हिरे यांनी सदरचा विषय मतदानासाठी ठेवल्यानंतर राकेश कोलते यांचे बाजूने नऊ सदस्यांनी हात वर करून त्यांना मतदान केले तर शेख सईदाबी हारून यांच्या बाजूने नगराध्यक्ष सुरेखा कोळी यांच्यासह एकूण आठ सदस्यांनी मतदान केले. शेख असलम शेख नबी यांच्या नावाचा पुकारा केल्यानंतरही ते सभेच्या अखेरपर्यंत उपस्थित झाले नाहीत. पालिकेत सर्वाधिक सात सदस्य असलेल्या सत्तारूढ गटातील काँग्रेसला यामुळे नामुष्की पत्करावी लागली.
निवडीनंतर समर्थकांचा जल्लोष
राकेश कोलते यांच्या उमेदवारी अर्जासाठी नौशाद तडवी यांनी सूचक म्हणून तर पौर्णिमा फालक यांनी अनुमोदक म्हणून स्वाक्षरी केली होती तर शेख सईदाबी हारून यांच्या उमेदवारी अर्जासाठी मनोहर सोनवणे यांनी सूचक तर रजीयाबी गुलाम रसूल यांनी अनुमोदक म्हणून स्वाक्षरी केली होती. उपनगराध्यक्षपदी राकेश कोलते यांची निवड जाहीर होताच सभागृहाबाहेर समर्थकांनी फटाके उडवून जल्लोष केला. सभागृहात सभेच्या कामकाजात कार्यालयीन अधीक्षक राजेंद्र देवरे, तुषार सोनार ,राजेंद्र गायकवाड यांनी सहकार्य केले. महर्षी व्यास आघाडीतील सदस्य प्रा. मुकेश येवले, कल्पना वाणी, अभिमन्यू चौधरी यांनी आतापर्यंत सत्तारूढ गटासोबत राहून त्यांना सहकार्य केले होते मात्र महर्षी व्यास आघाडीतर्फे या सदस्यांना पक्षादेश बजावण्यात आल्यामुळे व यापूर्वीच पक्षादेश झुगारल्या प्रकरणी दोन सदस्यांना पद गमवावे लागल्यामुळे उपरोक्त तिघे सदस्यांनी सत्तारूढ गटाची साथ सोडत महर्षी व्यास आघाडीचे गटनेते कोलते यांच्या बाजूनेच मतदान केले हे देखीलविशेष !