यावलला आज श्री महर्षी व्यास मंदिरावर गुरूपौर्णिमा उत्सव
महाराष्ट्रातील एकमेव मंदिर : भाविकांमध्ये अपूर्व उत्साह : दोन वर्षानंतर भाविकांना घडणार महर्षि व्यासांचे दर्शन
यावल : शहरातील महर्षी व्यास मंदिरात बुधवार, 13 गुरूपौर्णिमा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे. कोरोना संकटात गेल्या दोन वर्षांपासून उत्सव साजरा करता येत नव्हते शिवाय भक्तांनी मंदिरा बाहेरूनचं महर्षी व्यासांचे दर्शन घेतले होते. यंदा मात्र कोरोना संकट ओसरल्याने भाविकांना दर्शन घेता येणार असल्याने त्यांच्या आनंदाचे वातावरण आहे. आषाळशुध्द पौर्णिमेला यावल शहरातील श्री महर्षी व्यास यांच्या मंदिरात यात्रोत्सव साजरा होतो. जिल्ह्यासह राज्यभरातुन व शेजारील राज्यातुन मोठ्या प्रमाणावर भाविक येथे दर्शनासाठी येतात.
महाराष्ट्रातील एकमेव मंदिर यावलला
श्री महर्षी व्यासांची भारतात तीनच मंदिरे असून त्यापैकी महाराष्ट्रातील एकमेव मंदिर हे यावल येथे आहे. व्यासांना सकळ विश्वाचे गुरू मानण्यात येत त्यामुळे भाविक वर्ग गुरू पौर्णिमेलाचं व्यास पौर्णिमा मानतात. बुधवारी गुरूपौर्णिमेनिमित्त येथे सालाबादाप्रमाणे सकाळी 8 ते 10 या वेळेत श्री महर्षी व्यासांची महापूजा करण्यात येईल. त्यानंतर 10 ते सांयकाळपर्यंत भाविकांना महर्षीचे दर्शन घेता येणार आहे व सोबत महाप्रसादाचा वितरण करण्यात येईल. यात बुंदी व तांदळापासूसनचा भाताचा प्रसाद भाविकांना वितरण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. भाविकांना दर्शनार्थ अडचण येवू नये याकरीता सुमारे 100 स्वयंसेवक तथा यावल पोलिसांच्या वतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात येईल.
देशातील तीन मंदिरात यावलचे नाव
भारतात महर्षी व्यासांचे तीन मंदिरे असून त्यात उत्तर प्रदेशातील नेमिश्य येथे, दुसरे देखील उत्तर प्रदेशातील काशी येथे आहे तर महाराष्ट्रातील व्यासांचे मंदिर हे केवळ जळगाव जिल्ह्यातील यावल येथे आहे. म्हणून येथे राज्यभरातुन नव्हे तर शेजारील राज्यातील भाविकदेखील दर्शनार्थ येतात. 7 डिसेंबर 1994 मध्ये व्यास नगरीतील मंडळींनी एकत्र येवुन श्री व्यास मंदिर व श्री राम मंदिर संस्थानची स्थापना केली. यातूनच सर्वांच्या सहकार्याने 13 डिसेंबर 1999 मध्ये करवीर पिठाचे शंकराचार्य श्री विद्याशंकर भारती यांच्याहस्ते मंदिर नूतनीकरण करीत भगवान वेद व्यासांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली.