यावलला धाडसी घरफोडी ; सव्वा लाखांचा मुद्देमाल लंपास

0

यावल :- शहरातील फैजपूर रस्त्यावरील पूर्णवाद नगरमध्ये शुक्रवारी मध्यरात्रीनंतर धाडसी घरफोडी झाली. कुटुंबातील लोक छतावर झोपल्याने चोरट्यांनी डाव साधला. ही घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली. सोने-चांदीच्या दागिन्यांसह रोख रक्कम 5000 असा एकूण सव्वा लाखांचा ऐवज चोरून नेण्यात आल्याने शहरात एकच खळबळ उडाली. फैजपूर रस्त्यालगत असलेल्या पूर्णवाद नगरमध्ये मुरलीधर तुळशीराम पाटील राहतात. ते राज्य परिवहन मंडळात नोकरीला आहेत.

शुक्रवारी मध्यरात्रीनंतर त्यांच्या घरात अज्ञात चोरट्यांनी चोरी केली. घरात उकाडा होत असल्याने सर्व कुटुंबीय छतावर झोपले होते. हीच संधी साधत अज्ञात चोरट्यांनी घराच्या दरवाज्याचा कडी-कोयंडा तोडून घरात प्रवेश केला. कपाटात असलेले 34 ग्रॅम सोन्याचे दागिने व रोख रक्कम पाच हजार रुपये असा तब्बल सव्वा लाखाचा ऐवज चोरट्यांनी लांबवला. पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. शहरात घरफोडीचे सत्र पुन्हा सुरू झाल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. रात्रीची गस्त पोलिसांनी पुन्हा सुरू करावी, अशी मागणी होत आहे.