यावलला पाणी पेटले ; पालिका प्रवेशद्वारावर मडके फोडून प्रशासनाचा निषेध

0

मोर्चेकर्‍यांकडून पदाधिकारी, कर्मचारी धारेवर ; पाईन लाईनची तत्काळ पाहणी

यावल- मुस्लीम बांधवांचा पवित्र महिना रमजान सुरू असतानाही पाणीपुरवठ्याबाबत पालिका प्रशासनाने नियोजन न केल्याने व पाणीप्रश्‍न गंभीर बनल्याने मंगळवारी सकाळी 11 वाजेच्या सुमारास रणरागिणींनी पालिकेच्या प्रवेशद्वारावर मातीचे मडके फोडून प्रशासनाचा निषेध केला. तत्काळ पाण्याचा प्रश्न निकाली काढावा यासाठी पालिका कर्मचारी व पदाधिकार्‍यांना चांगलेच धारेवर धरले. महिलांच्या या रूद्रावतामुळे पालिका वर्तुळासह राजकीय गोटात चांगलीच खळबळ उडाली.

तक्रारींना केराची टोपली, संताप अनावर
गेल्या तीन वर्षांपासून शहरातील बाबुजीपुरा व संत रोहिदास नगर भागात कमी प्रमाणात पाणीपुरवठा होत असल्याची तक्रार वारंवार करूनही त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. तसेच वारंवार निवेदन देऊनही समस्या सुटत नसल्याने मंगळवारी नागरीकांच्या संतापाचा बांध फुटला आणि त्यांनी थेट पालिकेवर मोर्चा काढला. मुस्लिम बांधवांचा पवित्र रमजान महिना सुरू असल्याने पाण्याची अत्यंत आवश्यकता असल्याचा मुद्दादेखील यावेळी नागरिकांनी मांडला.

पोलीस बंदोबस्तात जोडणीचे काम
शहरात तीन दिवसाआड पाणीपुरवठा होत असला तरी भगवान बाबुजीपुरा, खाटीक वाडा, संत रोहिदास नगर या भागात थेट पाच दिवसाआड पाणीपुरवठा होत असल्याची तक्रार करण्यात आली आहे तसेच पालिकेच्यावतीने सदर समस्या सोडवण्यासाठी तत्काळ पाईपलाईनची पाहणी करीता पाणीपुरवठा विभागाचे राजेंद्र देवरे यांना पाठवण्यात आले. खाटीक वाड्यामध्ये मुख्य पाईपलाईनच्या व्हॉल जोडणीला काही नागरीकांनी विरोध केल्याने ही समस्या उद्भवली आहे, असे पालिकेचे म्हणणे आहे. त्यामुळे मंगळवारी झालेला उद्रेक पाहता पोलीस बंदोबस्तात जोडणीचे काम केले जाईल, असे नगराध्यक्षा सुरेखा कोळी यांचे पती शरद कोळी म्हणाले.

यांचा मोर्चा आंदोलनात समावेश
आंदोलकांमध्ये शबाना बी.फक्रुद्दीन, भारतीबाई डांबरे, शबनम बी, अनिता डांबरे, सरला सुरवाडे पाराबाई डांबरे, पल्लवी जंजाळे, अयुब खान, अश्फाक खान, अर्शद खान, शेख शकील, संजय सुरवाडे यांच्यासह मोठ्या संख्येने प्रभाग क्रमांक दोनमधील महिला-पुरुषांचा समावेश होता.