यावलला मोबाईल चोरी प्रकरणी ; आरोपीस दोन वर्ष शिक्षा

0

भुसावळ – यावल शहरातील आठवडे बाजारात झालेल्या मोबाईल चोरी प्रकरणी आरीफ रशीद खाटीक (रा.यावल) यास यावल न्यायालयाने दोन वर्ष सक्त मजुरीची व एक हजार रुपये दंडाची शिक्षा गुरुवार, 17 रोजी सुनावली. 22 डिसेंबर 2017 रोजी दुपारी 4.30 वाजेच्या सुमारास संजय बाजीराव भोईटे हे यावलच्या आठवडे बाजारात भाजी खरेदी करीत असताना त्यांच्या खिशातील 11 हजार रुपये किमतीचा व्हिवो कंपनीचा मोबाईल आरोपी आरीफ रशीद खाटीक याने चोरला होता. त्यावरुन यावल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणी यावल न्यायालयात न्या.डी.जी.जगताप यांच्या न्यायासनासमोर सुनावणी झाली. सरकारी वकील अ‍ॅड.नितीन खरे यांनी सात साक्षीदार तपासले. संजय भोईटे, धनराज सोनवणे, सिवैंदर तडवी व पोलिस उपनिरीक्षक सुनीता कोळपकर यांच्या महत्वपूर्ण साक्षी नोंदवण्यात आल्या. न्यायालयाने दोन्ही बाजूचा युक्तीवाद ऐकल्यानंतर संशयीत आरोपी आरीफ रशीद खाटीक (रा.यावल) यास दोन वर्ष सक्त मजुरीची व एक हजार रुपये दंडाची शिक्षा गुरुवारी सुनावली. गुन्हा सिद्ध करण्यासाठी सरकारी वकील अ‍ॅड. नितीन खरे यांनी केलेला युक्तीवाद प्रभावी ठरला.