यावल– सुमारे 110 वर्षाची परंपरा असलेल्या येथील श्री बालाजी महाराज रथोत्सवास महर्षी व्यास मंदिर पायथ्यालगतच्या नदीपात्रातून शनिवारी सायंकाळी सुरुवात झाली. बालाजी महाराजांच्या जयघोषात नागरीकांनी रथ ोढण्यास सुरवात केली. सुमारे साडेसहा वाजेच्या सुमारास महाराणा प्रताप नगराजवळील नदीपात्रात रथयात्रेचे आगमन झाले. सायंकाळी येथील महर्षी व्यास मंदिराजवळ नदीपात्रात ब्रम्हवृंदाच्या मंत्रोच्चारात रथाची महापूजा करण्यात आल्यानंतर रथ ओढण्यास प्रारंभ झाला. व्यास मंदिर ते महाराणा प्रताप नगरापर्यंत सुमारे एक किलोमीटर नदीपात्रातून श्री बालाजी महाराजांच्या जयघोषात नागरीकांनी रथ ओढत आणला. महाराणा प्रताप नगराजवळील नदीपात्रात या निमित्ताने यात्रोत्सवाचे आयोजन करण्यात आले तसेच खंडोबा महाराज यांच्या बारागाडया ओढण्यात आल्या. रथोत्सव, यात्रा आणि बारागाडया पाहण्यासाठी महिलांसह नागरीकांनी मोठी गर्दी केली होती. त्यानंतर रथयात्रेचे शहरात आगमन झाले असून रात्रभर रथोत्सवाचे मार्गक्रमण राहणार आहे. पहाटेच्या सुमारास भवाणी माता मंदिराजवळ रथोत्सवाची सांगता होणार आहे.