व्यापार्याच्या सतर्कतेने टळली लूट : अंजाळे घाटातही काही महिन्यांपूर्वी लूटले यावलच्या सराफाला
यावल- शहरातील फैजपूर रस्त्यावर एका व्यावसायीकाच्या डोळ्यात मिरची पावडर टाकून रोकड पळविण्याचा प्रयत्न फसल्याची घटना शनिवारी रात्री नऊ वाजेच्या सुमारास घडली. या घटनेनंतर पोलीस प्रशासनाने आरोपीचा सर्वत्र शोध सुरू केला असून रात्री उशिरा या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, काही महिन्यांपूर्वी अंजाळे घाटात यावलच्या सराफाला अशाच पद्धत्तीने लुटण्यात आले होते तर या गुन्ह्याचा उलगडा करण्यात अद्यापही पोलिसांना यश आलेले नसताना पुन्हा ही घटना घडल्याने व्यापार्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
व्यापार्याच्या सतर्कतेने लूट टळली
शहरातील नगरपालिकेच्या व्यापारी संकुलात फर्टीलायझर चा व्यवसाय करणारे संभाजी अशोक येवले (40) हे आपला दैनंदिन व्यवसाय उरकवून व्यवसायाचे सुमारे 40 ते 42 हजार रुपये एका पिशवीमध्ये ठेवून घरी जाण्यास निघाले होते. फैजपूर रस्त्यावर असलेल्या पेट्रोल पंपावरून दुचाकीच पेट्रोल भरण्याकरिता ते पेट्रोल पंपावर गेले पेट्रोल भरून परतत असताना हॉटेल भाग्यश्री च्या जवळ त्यांच्या मागून काळ्या रंगाच्या पल्सर दुचाकी वाहनावर तिघांनी त्यांचा रस्ता अडवला. एकाने मिरची पावडर त्यांच्या डोळ्यावर फेकली या प्रकारामुळे येवले घाबरले व दुचाकीवरून खाली कोसळले. तेव्हा तिघांपैकी दोघांनी त्यांच्याजवळील पैशाची पिशवी हिसकावण्याचा प्रयत्न केला मात्र येवले यांनी त्यास तीव्र विरोध करीत दोघांची झटापट झाली या झटापटी दरम्यान येवले यांनी आरडा-ओरड केल्याने नागरीक एकत्र आल्याने चोरट्यांनी धूम ठोकली. घटनेनंतर येवल यांनी पोलीस ठाणे गाठत पोलीस निरीक्षक दत्तात्रय परदेशी यांना घडलेली घटना सांगताच पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळाची पाहणी करण्यात आली तर या परीसरातील सीसीटीव्ही कॅमेर्यांची पाहणीवरून चोरट्यांचा शोध घेतलात जात आहे. उपनगराध्यक्ष प्रा.मुकेश येवले, नगरसेवक अभिमन्यू चौधरींसह अनेक व्यावसायीकांनी पोलीस स्टेशन गाठत येवले यांची विचारपूस केली.