पाणी चोरी केल्यास दाखल होणार प्रशासनाकडून गुन्हे
यावल- हतनूर धरणातून सध्या कालव्यात पाणी सोडण्यात आले आहे. तर सदर उजव्या कालव्यात सोडण्यात आलेले पाणी हे यावल, धरणगाव, चोपडा व अमळनेर नगर पालिकेसाठी पिण्याकरीता सोडण्यात आले असून या पाण्याचा सिंचनासाठी वापर शेतकर्यांनी करू नये व पाण्याची चोरी करू नये तसे केल्यास त्यांच्याविरुद्ध फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी कार्यालयाकडून एका प्रसिद्धी पत्रान्वये इशारा देण्यात आला आहे.
तर दाखल होईल गुन्हा
मागील वर्षी पावसाळ्यात अत्यंत कमी पाऊस झाल्यामुळे हतनुर धरणात आजमितीला अत्यल्प साठा आहे. धरणातील आवक ऑक्टोबर महिन्यालाच बंद झाल्यामुळे जलाशयातील पाणी कमी झाले आहे. पाणीप्रश्न लक्षात घेता 9 एप्रिल रोजी हतनुरच्या उजव्या कालव्यातून यावल, धरणगाव, चोपडा व अमळनेर नगरपालिकेसाठी जिल्हाधिकार्यांच्या आदेशान्वये पाणी सोडण्यात आले. या पाण्याचा कुणीही सिंचनासाठी वापर करू नये किंवा पाण्याची चोरी करू नये तसेच कालव्याचे गेटची जबरदस्तीने उघडून पाणी काढण्याचा प्रयत्न करू नये व गेटचे नुकसान होईल, असे कृत्य करू नये, असे आवाहन जलसंपदा खात्यामार्फत करण्यात आले आहे. तापी तीरावरील दोन्ही बाजूतील गावांना तापी नदीपात्रात सोडले पाणी हे पिण्यासाठी सोडण्यात आले असल्याकारणाने सदर पाण्याचा सिंचनासाठी वापर करतांना कुणी आढळल्या त्याच्याविरुद्ध चोरीचा फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.