यावल : गेल्या काही महिन्यांपासून संपावर असलेले एसटी कर्मचारी कामावर परतल्याने यावल एसटी आगारातील बससेवा पुन्हा सुरू झाली आहे. एकूण 240 कर्मचार्यांपैकी 120 कर्मचारी शनिवारी कामावर हजर झाले. तर उवर्रित कर्मचारी सोमवार पर्यंत परतणे अपेक्षीत आहे व सोमवारपासून आगार पूर्वपदावर येत सर्व बस फेर्या सुरू होतील असे आगार व्यवस्थापक म्हणाले.
120 कर्मचारी हजर
7 नोव्हेंबर 2021 पासून राज्य परिवहन मंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण व्हावे यासाठी एसटी आगार कर्मचार्यांनी संप पुकारला होता या संपात यावल आगारातील सर्व कर्मचारी सहभागी होत बससेवा ठप्प झाली होती. दरम्यान या संपात अनेक चढ-उतार आले आणि बससेवाही यात संपूर्ण राज्यात ठप्प होती. मात्र, सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर आता कर्मचारी कामावर परतू लागले आहेत. शनिवारी यावल आगारात 60 चालक, 60 वाहक असे 120 कर्मचारी कामावर हजर झाले आणि त्या कर्मचार्यांच्या माध्यमातून एस.टी. बस सेवा बर्यापैकी सुरू करण्यात आली आहे. सोमवारपर्यंत संपूर्ण 120 चालकाने 120 वाहक असे एकूण 240 कर्मचारी कामावर परतणे अपेक्षीत आहे व सर्व कर्मचारी हजर झाल्यावर सोमवार नंतर पूर्ण क्षमतेने यावल आगार पुनश्च सुरू होईल आणि पूर्णपणे 100 टक्के फेर्या सुरू केल्या जातील, असे प्रसंगी आगार व्यवस्थाप जी. पी. जंजाळ यांनी सांगितले.
प्रवाशांमधून समाधान
बससेवा सुरू झाल्याने प्रवाशांमधून समाधान व्यक्त केले जात आहे. प्रवाशांनी बससेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन यावल आगार व्यवस्थापक जी.पी.जंजाळ यांनी केले आहे.