शिवसेनेतर्फे तहसीलदार कुंदन हिरे यांना निवेदन ; वैद्यकीय कार्यात अडथळा आणणार्यांवरही व्हावी कारवाई
यावल- ग्रामीण रुग्णालयात निवासी वैद्यकीय अधिकार्यांची तत्काळ नेमणूक करावी. व वैद्यकीय कार्यात अडथळा निर्माण करणार्या समाजकंटकांवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी करणारे निवेदन शिवसेनेतर्फे तहसीलदार कुंदन हिरे यांना देण्यात आले. सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या तालुक्यात येथे शहरात ग्रामीण रुग्णालय कार्यरत असून येथे आदिवासी वर्ग मोठ्या प्रमाणावर औषधी उपचारासाठी नेहमीच येत असतात. येथे कायमस्वरूपी वैद्यकीय अधिकारी उपलब्ध नसल्यामुळे आरोग्य सेवा व विविध तपासण्या करण्यात अडचणी निर्माण होत असतात.
रीक्त पदे न भरल्यास आंदोलनाचा इशारा
ग्रामीण रुग्णालयाला उपजिल्हा रुग्णालय मंजुरी मिळाली असून सुद्धा येथे आरोग्य सेवेचा बोजवारा उडाला आहे तसेच काही पदे रीक्त असूनदेखील ती तत्काळ भरली गेलेली नाही. मृतदेहाच्या शवविच्छेदनासाठी संबंधित कुटुंबीयांना तास न तास येथे अडकून पडावे लागत असल्याची बाब नित्याचीच झाली आहे. यामुळे नातेवाईक व ग्रामीण रुग्णालयातील कर्मचार्यांमध्ये नेहमीच वादाचे खटके उडत असतात. ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी पदासह इतर रीक्त पदे तत्काळ भरण्यात यावी अन्यथा शिवसेना व युवासेनेतर्फे त्यांच्या पद्धतीने आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. प्रसंगी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख मुन्ना पाटील, नगरसेवक दीपक बेहेडे, आदिवासी सेल तालुकाप्रमुख हुसेन तडवी, तालुका उपप्रमुख शरद कोळी, युवा सेना शहर प्रमुख सागर देवांग, उपशहर प्रमुख संतोष खर्चे, किरण बारी, कुतुबुद्दीन कदरोद्दीन, सागर बोरसे आदी उपस्थित होते.