यावल तालुका कृषी कार्यालयात 70 लाखांचा अपहार

0

यावल- यावल तालुका कृषी अधिकारी कार्यालयातील तत्कालीन सहायक अधीक्षकांनी सेवेत असताना तब्बल 69 लाख 33 हजार 360 रुपयांचा अपहार केल्याने बुधवारी यावल पोलिसांत गुन्हा दाखल झाल्याने खळबळ उडाली आहे. जळगावचे उपविभागीय कृषी अधिकारी ज्ञानेश्वर राजाराम बोर्‍हाडे यांनी बुधवारी यावल पोलिसांत दिलेल्या फिर्यादीनुसार, यावल तालुका कृषी अधिकारी कार्यालयात तत्कालीन सहाय्यक अधीक्षक म्हणून नामदेव मंगा वाडे 21 एप्रिल 2006 ते 8 डिसेंबर 2013 दरम्यान कार्यरत असताना तत्कालीन तालुका कृषी अधिकारी यांच्या धनादेशावर स्वाक्षर्‍या घेऊन रक्कम वाढवून अपहार केला. विना रेखांकित अर्थात बेअरर चेक लिहून वेळोवेळी जेडीसीसी व स्टेट बँक ऑफ इंडियाच्या यावल शाखेतून तब्बल 69 लाख 33 हजार 360 रुपये परस्पर काढून अपहार तसेच शासनाची फसवणूक केली आहे. हा प्रकार हा चौकशीअंती निदर्शनास आल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आल्याने तालुका कृषी अधिकारी कार्यालयात प्रचंड खळबळ उडाली आहे.