यावल तालुक्यात दुचाकींची चोरी : चौघे पोलिसांच्या जाळ्यात

यावल : तालुक्यातील साकळी येथील क्रिकेट स्पर्धा पाहणार्‍या एकाची दुचाकी चोरी केल्याप्रकरणी शिरसाड गावातून एकास तर रविवारी रात्री साकळी गावातून दोघांना अटक करण्यात आली. तीनही आरोपींना यावल न्यायालयाने 14 पर्यंत पोलिस कोठडी सुनावली. एका आरोपीकडून चोरलेली दुचाकी हस्तगत करण्यात आली असून आणखी एकास रात्री उशिरा चौकशीकामी ताब्यात घेण्यात आले आहे.

दुचाकी चोरीचे अनेक गुन्हे उघडकीस येणार
साकळी, ता.यावल येथे मनवेल रस्त्यावर क्रिकेट स्पर्धा पाहणार्‍या शेख हकिम अब्दुल हक यांची दुचाकी (क्रमांक एम. एच. 19 बी. आर. 8879) ही शनिवारी चोरी झाली होती. या प्रकरणी यावल पोलिसात गुन्हा दाखल होता. या गुन्ह्याच्या तपासात यावल पोलिसांनी शिरसाड येथील शंकर नथ्थु कोळी (28) यास अटक केल्यानंतर त्याने दुचाकी चोरीची कबुली दिली. यावल न्यायालयात कोळी यास न्या.एम.एस. बनचरे यांच्यासमोर हजर केले असता 14 डिसेंबरपर्यत तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. या गुन्ह्यात तपास करतांना दुचाकी चोरी प्रकरणी रविवारी रात्री 9 वाजेला पुरूषोत्तम चंद्रसिंग लोधी (32) व निलेश उदयसिंग लोधी (24, दोन्ही रा.साकळी) यांना अटक करण्यात आली व सोमवारी आरोपींना न्यायालयाने 14 पर्यंत पोलिस कोठडी सुनावली. पुढील तपास पोलिस निरीक्षक सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार विजय पाचपोळे करीत आहे. संशयीतांकडून आणखी काही दुचाकी चोरीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.