कोट्यवधींची हानी ; 21 घरांचे लाखो रुपयांचे नुकसान
यावल- शहरासह व परीसरात रविवारी दुपारी झालेल्या जोरदार वादळामुळे प्राथमिक अंदाजानुसार 21 घरांचे 90 हजार रुपयांचे तर 163 शेतकर्यांची 198 हेक्टर क्षेत्रातील केळी आडवी झाल्याने कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. तहसीलदार जितेंद्र कुंवर यांनी तालुक्यातील शिरसाड आणि यावलच्या शेतशिवारास भेट देवून नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली आहे व पंचनाम्याचे आदेश दिले.
पश्चिम गावांना वादळाचचा तडाखा
रविवारी तालुक्यात जोरदार वादळाचा तडाखा बसला आहे. यात विशेषत: तालुक्यातील पश्चिम भागातील गावे बाधीत झाली आहेत. पिंप्री येथे 10 घरांचे 40 हजारांचे, भालशीव येथे चार घरांचे 10 हजारांचे तर वढोदे प्र. यावल येथील सात घरांचे 40 हजार रुपयाचे असे 90 हजार रुपयाचे नुकसान झाले.
केळी असे झाले नुकसान
यावल शिवारातील 110 शेतकर्यांचे 120 हेक्टर क्षेत्रातील तर पिंप्री शिवारातील 10 शेतकर्यांचे 25 हेक्टरमध्ये, भालशीव शिवारातील पाच शेतक-यांचे 10 हेक्टरमध्ये, विरावलील शिवारातील 11 शेतकर्यांचे 15 हेक्टर आणि वढोदे प्र. यावल शिवारातील 15 शेतकर्यांचे 12 हेक्टरमधील व नावरे येथील 12 शेतकर्यांचे 16 हेक्टरमधील केळीचे नुकसान झाले. एकूण 163 शेतकर्यांचे 198 हेक्टर मधील कोट्यवधींचे नुकसान झाले असल्याचा प्राथमि अंदाज असल्याचे निवासी नायब तहसीलदार आर. के. पवार यांनी सांगीतले.
तहसीलदारांनी केली नुकसानीची पाहणी
तहसीलदार जितेंद्र कुंवर यांनी सोमवारी सकाळी नुकसानग्रस्त केळी बागास भेट देवून शेतकर्यांशी चर्चा केली. तहसीलदार कुंवर यांनी शिरसाड आणि यावल शिवारातील नुकसानग्रस्त केळी बागांची पाहणी करून त्त्काळ पंचनाम्याचे आदेश दिले. कृषी विभाग व महसुल विभागाच्या वतीने संयुक्त पंचनामे केले जाणार असल्याचेही कुवर यांनी सांगितले. प्राथमिक पाहणी व्यतिरीक्त शेतकर्यांचे झालेले नुकसान असेल तर त्यांचेही पंचनामे केले जाणार असल्याचेही तहसीलदारांनी सांगितले.