यावल- यावल पालिकेच्या नगराध्यक्षा सुरेखा कोळी यांनी अनुसूचित जमातीचे वैध प्रमाणपत्र मुदतीत सादर केले नसल्याने त्यांचे पद रद्द करून त्यांना अपात्र घोषित करावे या मागणीसाठी येथील नगरसेवक अतुल पाटील यांनी जिल्हाधिकार्यांकडे याचिका दाखल केली होती तर ही याचिका जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर यांनी फेटाळत नगराध्यक्ष सुरेखा कोळी यांचे पद अबाधित ठेवल्याने नगराध्यक्षांना मोठा दिलासा मिळाला आहे.
न्यायप्रविष्ट बाबीमुळे नगराध्यक्षांना दिलासा
यावल पालिकेत 27 नोव्हेंबर 2016 ला झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत अनुसूचित जमाती महिला राखीव गटातून लोकनियुक्त नगराध्यक्ष म्हणून सुरेखा शरद कोळी निवडून आल्या होत्या. कोळी यांनी नामनिर्देशन पत्रासोबत जातीचे वैध प्रमाणपत्र सहा महिन्यांच्या आत मुदतीत सादर करणार असल्याचे हमीपत्र दिले होते मात्र आवश्यक त्या मुदतीत जातीचे वैध प्रमाणपत्र सादर न केल्यामुळे संबंधितांविरुद्ध महाराष्ट्र नगरपरिषदा नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम1965चे कलम 9 ( अ ) व 44 ई प्रमाणे कारवाई होऊन त्यांना अपात्र घोषित करण्यासंदर्भात अर्ज दाखल होता. या अर्जांवर जिल्हाधिकारी यांनी हा निर्णय दिला आहे. लोकनियुक्त नगराध्यक्ष सुरेखा कोळी यांना पदावर अनर्ह ठरविण्याकरिता अपील अर्ज कलम 51(1)(ब) नुसार करणे आवश्यक आहे. अर्जदार अतुल पाटील यांनी कलम 44 ई अन्वये अपिल दाखल केलेले आहे. त्यामुळे अर्जदार यांचा अर्ज फेटाळण्यात येत आहे. नगराध्यक्ष कोळी यांचा नगराध्यक्षपदाकरीता अनर्ह न ठरविण्याबाबत उच्च न्यायालयाचा अंतिम निकाल पारीत झालेला नाही व सदरील बाब न्यायप्रविष्ट असल्याने नगराध्यक्ष सुरेखा कोळी यांना अपात्र घोषित करता येणार नाही, असा निकाल जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी दिला आहे.