यावल पंचायत समितीच्या सभेला विरोधक, सत्ताधार्‍यांचा बहिष्कार

0

यावल- पंचायत समितीच्या सोमवारी झालेल्या मासिक सभेत यापूर्वीच्या सभेच्या इतिवृत्तात खोटा मजकूर लिहिल्याचे समोर आले. या कारणावरून विरोधकांनी सभेवर बहिष्कार टाकला. सत्ताधार्‍यांनी देखील सभात्याग केला.
सोमवारी मागील सभेचे इतिवृत्त वाचून कामकाजाला सुरुवात झाली. मात्र, 19 सप्टेंबरच्या मागील मासिक सभेत ऐनवेळी काही विषय मांडण्यात आले होते. त्यावर 144, 145, 146 व 147 क्रमांकाचे ठराव करून व सभागृहात त्यावर चर्चा झाली. ही चर्चा सुरू असताना बैठकीचे सचिव तथा बीडीओ वाय.पी.सपकाळे यांनी सभागृहात कुठलेच भाष्य, सुचना अथवा हरकत नोंदवली नाही. मात्र, सोेमवारच्या सभेत इतिवृत्त वाचताना वरील चारही विषयांनुसारचे प्रस्ताव आयत्यावेळी मंजुरीसाठी सादर न करण्याबाबत सदस्यांना विनंती केली, असे नमूद असल्याचे समोर आले. यामुळे सभागृहात गोंधळ उडाला. बीडीओंनी असे काही एक सांगीतले नसताना इतिवृत्तात अशी खोटी नोंद कुणी केली? असा सवाल विरोधी गटाचे उपसभापती उमाकांत पाटील, काँग्रेेसचे गटनेते शेखर पाटील यांनी उपस्थित केला. यानंतर सहकारी सदस्य सर्फराज तडवी व कलीमा तडवी यांच्यासह सभेवर बहिष्कार टाकला. सभापती पल्लवी पुरूजित चौधरी, प्रभारी बीडीओ किशोर सपकाळे यांची सभेला उपस्थिती होती.

सभापती चौधरींनी केली जि. प. सीईओंकडे तक्रार
अधिकारी मनमानी करून खोटे इतिवृत्त लिहतात. या मनमानीविरुद्ध सभापती पल्लवी चौधरींसह सत्ताधारी भाजपचे गटनेते दीपक पाटील, योगेश भंगाळे, लताबाई कोळी व लक्ष्मीबाई मोरे यांनी देखील सभात्याग करून जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांकडे सभेच्या सचिवांवर कारवाईची मागणी केली. यासाठी त्या तक्रार करणार आहेत.