यावल- पालिकेची विशेष सभा सत्ताधारी व विरोधकांवर केलेल्या आरोपाने चांगलीच गाजली. सोमवारी झालेल्या सभेत 20 विषय अजेंड्यावर ठेवण्यात आले होते. सत्ताधार्यांना स्वच्छ अभियान जनजागृती निविदेचा विषय तहकुबीची तर एक विषय बहुमताच्या जोरावर मंजुर करण्याची वेळ आली तर सत्ताधारी हे विरोधकांशी विकास कामासंदर्भातदेखील भेदभाव करीत असल्याचा आरोप थेट सभागृहात करीत लोकनियुक्त नगराध्यक्ष म्हणून संपूर्ण शहराने आपणास निवडून दिले असून किमान त्या मतदारांचे कामे करा, अशा शब्दात विरोधकांनी नगराध्यक्षांचे कान टोचले.
मतभेदामुळे सत्ताधार्यांकडून विषय तहकुब
पालिकेची सोमवारी विशेष सभा नगराध्यक्षा सुरेखा कोळी यांच्या अध्यक्षतेखाली झाली. विषय क्रमांक 12 हा शहरात स्वच्छ महाराष्ट्र अभियान अंतर्गत जनजागृतीसाठी आलेल्या निविदेचा असलातरी विविध प्रकारच्या दरावरून सभागृहात एकमत न झाल्याने हा विषय तहकुबीची वेळ आली. विषय क्रमांक 18 चर्चेस आला त्यात पालिकेने जलशुध्दीकरण केंद्राची स्वच्छता कामाकरीता काढलेल्या निविदांना नगराध्यक्ष यांच्या 58 (2) अन्वये दिलेल्या कार्यात्त मंजुरी व प्राप्त निविदा मंजुर करण्याचा विषय चांगलाचं गाजला. या विषयावर सत्ताधारी व विरोधकांमध्ये खडाजंगीच झाली. जिल्हाधिकार्यांकडून चौकशी पूर्ण होत नाही तो पर्यंत हा विषय रद्द ठेवावा, असे विरोधी गटाचे नगरसेवक अतुल पाटील, राकेश कोलते, शेख असलम शेख नबी आदींनी सभागृहात सांगितले मात्र विरोधकांचा विरोध न जुमानता नगराध्यक्ष सुरेखा कोळी यांनी बहुमताच्या जोरावर हा विषय मंजूर केला.
यांची विशेष सभेला उपस्थिती
सभागृहात मुख्याधिकारी रवींद्र लांडे, उपनगराध्यक्ष प्रा. मुकेश येवले, सत्ताधारी गटाचे नगरसेवक दिपक बेहेडे सह नगरसेवकांची उपस्थिती होती विषय वाचन अभियंता एस.ए.शेख यांनी केले तर सभागृहात रमाकांत मोरे, राजेंद्र देवरे आदींनी कामकाज पाहिले.