यावल पालिकेत 125 वर्षानंतर तडवी समाजाला संधी : नगराध्यक्षपदी नौशाद तडवींची वर्णी

0

यावल नगरपालिकेत सत्तेची चावी पुन्हा माजी नगराध्यक्ष अतुल पाटील गटाकडे : निवडीनंतर जल्लोष

यावल : नगरपरीषदेच्या नगराध्यक्षपदी नौशाद मुबारक तडवी यांची मंगळवारी बिनविरोध निवड करण्यात आली. मंगळवारी यावल नगरपरीषदसभागृहात सकाळी 11 वाजता फैजपूर विभागाचे प्रांताधिकारी व सभेचे पीठासन अधिकारी डॉ.अजित थोरबोले यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक झाली. नगराध्यक्षपद हे अनुसूचित जमातीसाठी राखीव असल्याने व या जागेसाठी एकमेव महिला नगरसेवक म्हणून नौशाद मुबारक तडवी या निवडून आल्याने त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली. यावल पालिकेच्या इतिहासात आदिवासी महिलेची नगराध्यक्षपदावर निवड झाल्याने समाजातील सर्व स्तरावरून आनंद व्यक्त करण्यात आला.

तत्कालीन नगराध्यक्षांना जात प्रमाणपत्राचा फटका
यावल नगरपरीषदच्या तत्कालीन शिवसेनेच्या लोकनियुक्त नगराध्यक्ष सुरेखा शरद कोळी यांनी वेळेच्या आत आपले जातवैधता पत्र सादर न केल्याने त्यांना पायउतार व्हावे लागले होते तर रीक्त झालेल्या जागेवर नगराध्यक्षपदाच्या उमेदवारी करीता नौशाद तडवी यांनी मंगळवारी रोजी मुख्याधिकारी बबन तडवी यांच्याकडे आपला अर्ज दाखल केला होता. या पदासाठी नौशाद मुबारक तडवी यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली.

यांची होती उपस्थिती
ऑनलाईन सभेव्दारे नगरसेवक तथा माजी नगराध्यक्ष अतुल पाटील, राकेश कोलते , नगरसेवक प्रा. मुकेश येवले, सैय्यद युनूस सैय्यद युसूफ, शेख समीर मनोहर सोनवणे, दीपक बेहडे, डॉ.कुंदन फेगडे, नगरसेविका देवयानी महाजन, पौर्णिमा फालक, रेखा चौधरी, कल्पना वाणी, रुख्मणी भालेराव उपस्थित होत्या. संणूर्ण निवडीच्या ऑनलाईन प्रक्रीयेत नगरपरीषदेचे मुख्याधिकारी बबन तडवी यांच्यासह नगर परीषदेचे रमाकांत मोरे, शिवानंद कानडे, विनय बढे यांनी सहभाग घेतला, दरम्यान नौशाद तडवी यांची नगराध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचे नगरसेवक तथा माजी नगराध्यक्ष अतुल पाटील, तत्कालीन प्रभारी नगराध्यक्ष राकेश कोलते व आदींनी त्यांचा सत्कार केला.

शहराचा सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न : नौशाद तडवी
यावल नगरपरीषदेच्या 125 वर्षाच्या कार्यकाळात प्रथमच आदिवासी तडवी या समाजाला शहराचे प्रतिनिधीत्व करण्याची संधी मिळाली आहे. यामागे आमचे नेते माजी नगराध्यक्ष व नगरसेवक अतुल पाटील यांचा व सहकार्‍यांचा संघर्ष कामी आला. पुढील काळात अतुल पाटील यांच्या मार्गदर्शनाने व नेतृत्वाखाली शहराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे नगराध्यक्ष नौशाद तडवी म्हणाल्या.