यावल मतदारसंघाचे शिरीष चौधरीच होणार भावी आमदार

0

भाजपा नगरसेवक अतुल पाटलांच्या वक्तव्याने राजकीय गोटात खळबळ

यावल- काँग्रेसचे माजी आमदार शिरीष चौधरी हे भावी आमदार असून ते आगामी विधानसभा निवडणुकीत मोठ्या मताधिक्क्याने निवडून येतीलच, असे वक्तव्य माजी मंत्री एकनाथराव खडसे यांचे कट्टर समर्थक, माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक अतुल पाटील यांनी येथे केल्याने तालुक्यातील राजकीय गोटात मोठी खळबळ उडाली आहे. भाजपामध्ये जिल्ह्यातील उभी फूट ही सर्वांनाचं ज्ञात आहे तर रावेर मतदारसंघदेखील त्यास अपवाद नाही. त्यातल्या-त्यात यावल शहरात तर भाजपा पक्षांतर्गत बाजार समितीपासूनच वादाची ठिणगी पडली आहे.

आमदार जावळेंना अतुल पाटलांचा विरोध
माजी मंत्री खडसे यांचे कट्टर समर्थक, माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक अतुल पाटील हे सरळ-सरळ विद्यमान आमदार हरीभाऊ जावळेंचा विरोध करतांना दिसत आहे. फैजपूर रस्त्यावरील नेवे मंगल कार्यालयात एका सार्वजनिक कार्यक्रमात अध्यक्षस्थानी माजी आमदार शिरिष चौधरी होते तर प्रमुख उपस्थितीत पंचायत समितीचे गटनेता शेखर पाटील, माजी मंत्री एकनाथराव खडसे यांचे कट्टर समर्थक अतुल पाटील यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती. या कार्यक्रमात नगरसेवक अतुल पाटील यांनी आपल्या भाषणात भावी आमदार म्हणुन शिरीष चौधरी यांचा उल्लेख केला व ते सुसंस्कृत कुटुंबातील व्यक्ती असुन शैक्षणिक क्षेत्रात त्यांचे मोठे योगदान आहे, सर्व समाजाला घेवून चालण्याची त्यांची भूमिका आहे तर ते मतदारसंघात ते निवडून येतील, असे वातावरणत असून तेच आमदार होतील, असा विश्वास आहे, असे पाटील यांनी म्हणताच टाळ्यांचा कडकडाट झाला तर या वक्तव्यानंतर भाजपाच्या राजकीय गोटात मोठी खळबळ उडाली आहे. पाटील यांचे हे वक्तव्य म्हणजे ते भाजपाचे असतांना विद्यमान आमदार हरीाऊ जावळे यांच्या विरूध्द उघड विरोध केल्याचे दिसुन येते.

आमदारांनी पक्षशिस्त मोडल्याने आम्हीदेखील मोडणार -अतुल पाटील
आमदार जावळे यांनी माझा विरोध केला, मी त्यांचा करतो. भाजपाचे नगरसेवक म्हणुन ज्या कार्यक्रमावर आम्ही बहिष्कार टाकला त्या कार्यक्रमास आमदारांनी उपस्थिती दिली, तेव्हा आम्ही भाजपात आहोत हे ते आमदार मानतात का ? असा प्रश्न अतुल पाटील यांनी उपस्थित करू सांगितले की, शहरात अनेक कार्यक्रम झाले त्यात आमदारांनी कधी बोलावले नाही. पक्षाची शिस्त स्वतः आमदार मोडतात तेव्हा आम्हीदेखील मोडणार ! आपणास गटनेत्यापासून रोखणे व केवळ मी मराठा समाजाचा असल्याने मी गटनेता होवू नये म्हणून माझा विरोध दाखवला होता. नगरपालिकेच्या राजकारणात ढवळाढवळ केली, माझ्या विरोधकांना जावुन भेटणे, माझा विरोध करणे असे प्रकार झाल्याने आपणदेखील आमदारांना विरोध करणार असल्याचे ते म्हणाले.