यावल मुख्याधिकारी जळगाव एसीबीच्या जाळ्यात

28 हजारांची लाच भोवली : पालिकेच्या वर्तुळात मोठी खळबळ

यावल : जळगावच्या कंत्राटदाराला रस्ता कामाची वर्क आऊट ऑर्डर काढून देण्याच्या मोबदल्यात 28 हजारांची लाच घेताना पालिकेचे मुख्याधिकारी बबन गंभीर तडवी (रा.मातृस्नेहा हाऊसिंग सोसायटी, ई-विंग, शहाड रेल्वे स्टेशनच्यामागे, कल्याण, ह.मु.रा.राजोरी, ता.पाचोरा, जि.जळगाव) यांना जळगाव एसीबीच्या पथकाने शुक्रवारी दुपारी अटक केल्याने पालिकेच्या वर्तुळात मोठी खळबळ उडाली.

पालिका कार्यालयातच स्वीकारली लाच
जळगावच्या 42 वर्षीय तक्रारदाराला यावलच्या वाणी गल्लीतील रस्त्याच्या कामाची वर्क आऊट ऑर्डर काढुन देण्याच्या मोबदल्यात आरोपी मुख्याधिकारी बबन तडवी यांनी 29 व 30 जुलै रोजी 28 हजार रुपये लाचेची मागणी केली होती. तक्रारदाराला लाच द्यावयाची नसल्याने त्यांनी जळगाव एसीबीकडे तक्रार नोंदवल्यानंतर सापळा रचण्यात आला. यावल पालिकेच्या कार्यालयातच मुख्याधिकार्‍यांनी तक्रारदाराकडून लाच स्वीकारताच त्यांना अटक करण्यात आली. या कारवाईने यावल पालिकेच्या वर्तुळात मोठी खळबळ उडाली.

यांनी केला सापळा यशस्वी
जळगाव एसीबीचे नूतन पोलीस उपअधीक्षक शशीकांत एस.पाटील, पोलीस निरीक्षक संजोग बच्छाव, पोलीस निरीक्षक निलेश लोधी, हवालदार अशोक अहिरे, हवालदार सुनील पाटील, एएसआय सुरेश पाटील, हवालदार रवींद्र घुगे, नाईक मनोज जोशी, नाईक सुनील शिरसाठ, नाईक जनार्दन चौधरी, कॉन्स्टेबल प्रवीण पाटील, कॉन्स्टेबल नासीर देशमुख, कॉन्स्टेबल ईश्वर धनगर, कॉन्स्टेबल प्रदीप पोळ आदींच्या पथकाने हा सापळा यशस्वी केला.