यावल । गेल्या वर्षीच्या उन्हाळ्यात शहरावर पाणीटंचाईचे सावट निर्माण झाले होते. यासाठी पालिकेने कृती आराखडा तयार करत शहरातील वापरात नसलेल्या 10 पैकी 6 विहिरी पुनर्जीवित करण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकार्यांकडे पाठवला होता. सुमारे 10 लाख खर्चाच्या या कामाकडे नंतर दुर्लक्ष झाले. यंदादेखील हे काम मागे पडले. त्यामुळे ऐनवेळी उपाययोजना करण्यापेक्षा खबरदारी म्हणून अगोदरच या विहीरींच्या कामांना गती देण्याची मागणी शहरवासीयांमधून होत आहे.
शहरात वर्षभरापूर्वी पाणीटंचाई निर्माण झाली असता पालिकेने मार्च 2016मध्ये टंचाई कृती आराखडा तयार केला होता. मात्र, हतनूरने आवर्तन दिल्याने टंचाई दूर झाली होती. यानंतर विहिरींच्या दुरुस्तीचा आराखडादेखील रेंगाळला होता. यंदा टंचाई नसली तरी पालिकेने विहिरींची दुरुस्ती करावी, अशी शहराची अपेक्षा होती. मात्र, त्याविषयी हालचाली नसल्याने दुरुस्तीसाठी केलेले सर्वेक्षणदेखील वाया गेले आहे. शहरातील सहा जुन्या विहिरी पुनर्जीवित करण्यासाठी तांत्रिक अडचणींमुळे निधी उपलब्ध होऊ शकत नाही. त्यात टचांईसदृश स्थिती नसल्याने जिल्हा टंचाई निवारण कक्षाकडे यंदा निधीच उपलब्ध नाही. विहिरींची दुरुस्ती किंवा पुनर्जीवनासाठी कुठूनही निधीची तरतूद नसल्याने पालिकेने सांगितले आहे.