यावल रावेर तालुक्यातील प्रलंबित वनदाव्यांच्या पडताळणीला सुरुवात

0

वनदावे न आणणार्‍यांवर प्रांधिकारी डॉ.थोरबोले भडकले : 800 दावे येणे अपेक्षित होते मात्र आले फक्त 100

फैजपूर – आदिवासी भागातील वनमित्र मोहीम अंतर्गत असलेले यावल रावेर तालुक्यातील 14 गावांचे प्रलंबित वन दाव्यांची पडताळणीसाठी मंगळवारी प्रांतधिकारी डॉ.अजित थोरबोले यांच्या मार्गदर्शनाखाली सकाळी 11 वाजता स्वामी समर्थ मंगल कार्यालयात सुरू झाली. वन दाव्यासंदर्भात 26 व 27 जून या दोन दिवसात सर्व दाव्यांची पडताळणी सुरू राहणार आहे. या 14 गावातील तलाठी, ग्रामसेवक, वनपाल, वनरक्षक व ग्रामस्थरीय वनहक्क समितीचे अध्यक्ष व सचिव या बैठकीला अपेक्षित होते. मंगळवारी यावल तालुक्यातील जामण्या, गाड्र्या, लंगडा आंबा, हरीपुरा, रुईखेडा व मोहराळे आणि रावेर तालुक्यातील कुसुंबा, लोहारा, जानोरी, मोघन, तिळे, अंधमळी, पाल या गावांची वनहक्क दाव्यांची पडताळणी सुरु आहे. वनमित्र मोहीम अंतगर्त वैक्तिक प्रलंबित असलेले दाव्यांचा जलद गतीने निपटारा व्हावा यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सहा महिन्यांची मुदत देण्यात आली होती. त्या अनुषंगाने या दाव्यांची पडताळणी करणे गरजेचे आहे. प्रांतधिकारी डॉ.अजित थोरबोले यांनी गावनिहाय आढावा घेतला व प्रलंबित वन दाव्यांच्या संदर्भात ग्रामस्थरीय वनहक्क समितीचे अध्यक्ष, सचिव, व संबधित गावांचे तलाठी, ग्रामसेवक, वनपाल, वनरक्षक यांच्यात समन्वय साधून वन दाव्यांचा जलद गतीने निपटारा करण्यासाठी प्रांतधिकारी डॉ अजित थोरबोले यांनी मार्गदर्शन केले.

वनसमिती गावातील अनुपस्थिती
वनहक्क दाव्यांचा जलद गतीने निपटारा व्हावा यासाठी शासनाने गावातील वनसमिती स्थापन केली होती यात गावातील स्थानिक नागरीक या समितीचे अध्यक्ष व सचिव होते. मंगळवारी कागदपत्रांची पडताळणी होणार असल्याची माहिती असून सुद्धा या महत्त्वपूर्ण बैठकीकडे समितीने कानाडोळा केला आहे मात्र या समितीला बुधवार, 27 रोजी परत बोलावण्यात आले आहे.

प्रांतधिकारी डॉ.थोरबोले भडकले
तिड्या, मोहमांडली व अंधारमळी या तीनच गावातील दावे आले होते तर लोहारा व कुसुंबा या दोन गावातील दावे यांची प्रकिया पूर्ण झाली असून ग्रामसभेचा ठराव करून प्रांत कार्यालयात दाखल करणारा आहे. वनहक्क दाव्यांसाठी 14 गावातील 800 दावे येणे मंगळवारी अपेक्षित असल्याने फक्त 125 दावे ाणले असल्याने प्रांतधिकारी डॉ.अजित थोरबोले ग्रामसेवक, तलाठी, वनपाल व वनरक्षक यांच्यावर चांगलेच भडकले. ज्यांनी दावे आणले नाही त्यांना बुधवारी सकाळी आठ वाजता परत बोलावण्यात आले आहे.

बुधवारी या गावांची होणार पडताळणी
यावल, सौखेडासीम, वाघझिरा, आंबापाणी, वड्री, चारमळी व हिंगोणा, रावेर, गावाही, गारखेडा, निमड्या, सहस्त्रलिंग, लालमाती व मोहमांडली या गावांची वनहक्क दाव्यांची पडताळणी स्वामी समर्थ मंगल कार्यालय, फैजपूर येथे होणार आहे. प्रांताधिकारी डॉ.अजित थोरबोले यांच्या अध्यक्षतेखाली लोकसंघर्ष मोर्चाच्या प्रतिभा शिंदे, नायब तहसीलदार पी.सी.धनगर, वनहक्क सहाय्यक कलेश हातकर, योगेश केदारे, तलाठी एस.एफ.खान व संजय राजपूत यांनी कामकाज बघितले.

आदिवासींना हक्काच्या जागेसाठी प्रामाणिकपणे वनदाव्यांचे काम -प्रांताधिकारी
आदिवासी बांधवांना त्यांची हक्काची जागा मिळावी यासाठी राज्य शासन प्रामाणिक पणे वनहक्क दाव्यांसाठी काम करीत आहे. मंगळवारी बैठकीला ग्रामसेवक, तलाठी, आणि ग्रामसामिती अध्यक्ष व सचिव येणे अपेक्षित होते मात्र ते या बैठकीला आले नाही आणि 14 गावांची पडताळणी झाली पाहिजे होती मात्र 800 पैकी फक्त 125 दावेच आले असल्याने बाकीच्यांना परत पाठवले असल्याचे प्रांताधिकारी अजित थोरबोले म्हणाले.