यावल- शहरातील फैजपूर रस्त्यावर पेट्रोल पंपामागील मोकळ्या जागेत थांबलेल्या उतारूंकडून चंदनाच्या लाकूड असल्याची माहिती मिळाल्यानंतर वनविभागाने त्यांच्याकडून 18 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल गुरुवारी जप्त करीत पिता-पुत्रास अटक केली आहे. पोलिस गस्तीवर असताना उतारूंची चौकशी केली असता ते चंदनाच्या लाकडाचे ठोकळे विक्री करणार असल्याचे कळाल्यानंतर पोलिसांनी वनक्षेत्रपाल विशाल कुटे, व्ही.एम.पाटील यांना कळविले. त्यांनी तातडीने ढुबराज छोटूलाल पारधी व रुबीतलाल ढुबराज पारधी (दोन्ही रा.हरदुवा, जि.कटनी, म. प्र.) या दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून 11 किलो 588 ग्रॅम चंदनाच्या लाकडाचे जप्त करण्यात आले असून आरोपी पिता-पुत्रावर वनकायद्यान्वये गुन्हा नोंद करण्यात आला. पुढील तपास उपवनसंरक्षक प्रकाश मोराणकर, सहायक वनसरंक्षक मधुकर नेमाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.