यावल- शहरातील अल्पवयीन 17 वर्षीय तरुणीला पळवून नेल्याप्रकरणी पाच संशयीतांविरुद्ध तरुणीच्या पित्याने दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. शहरातील विरार नगरातील अल्पवयीन तरुणी 16 जूनच्या मध्यरात्रीपासून बेपत्ता असल्याने तिचा शोध सुरू होता तर महिन्याभरापूर्वी ज्या तरुणाने या तरुणीशी प्रेम असल्याचे कारण पुढे करून मुलीच्या कुटुंबीयांशी वाद घातला होता तो मुलगादेखील शहरातून गायब असल्याने या तरुणानेच तरुणीला पळवून नेल्याचा संशय आहे.
पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल
महिन्याभरापूर्वी शहरातीलच रहिवासी आरीफ भटू पटेल या तरुणाने फिर्यादीच्या अल्पवयीन मुलीशी प्रेमसंबंध असल्याचे कारण पुढे करत त्यांच्याशी वाद घातला तर त्यावेळी आरीफ पटेलची आत्या कमा नजीर पटेल (रा.पिंप्री, ता.धरणगाव) यांच्यासह त्या तरुणास कुटुंबियांनी समज दिली मात्र त्यावेळी त्या तरुणाने अल्पवयीन तरुणीला पळवून नेवू, अशी धमकीदेखील दिली होती. आपल्या अल्पवयीन तरुणीस काहीतरी फुस दाखवून पळवून नेल्याची पित्यास शंका असल्याने त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून बुधवारी यावल पोलिसात मुख्य संशयीत आरोपी आरीफ भटू पटेल, मरीयम दौलत पटेल, हमीद दौलत पटेल, शकील दौलत पटेल (सर्व राहणार यावल) व कमा नजीर पटेल (रा.पिंप्री, ता.धरणगाव) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश तांदळे, पोलीस उपनिरीक्षक सुनीता कोळपकर, हवालदार संजय तायडे करीत आहेत.