गतवर्षी पथकाला सामूहिक कॉपीचे आढळले होते प्रकार ; अभिप्रायाची दखल
यावल- नॅशनल एज्युकेशन सोसायटी संचलित डॉ. झाकीर हुसेन उर्दू हायस्कूलमधील इयत्ता दहावीचे परीक्षा केंद्र रद्द करून ते इतरत्र देण्याविषयीचे नाशिक येथील परीक्षा मंडळाचे आदेश येथे धडकल्यामुळे शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. गतवर्षी भरारी पथकाला या केंद्रावर सर्रासपणे कॉपी सुरू असल्याचे प्रकार सुरू असल्यानंतर पथकाने हे केंद्र बंद करण्याचा अभिप्राय दिला होता व त्याची दखल घेण्यात आल्याचे सांगण्यात आले.
कॉपी आढळल्याने परीक्षा केंद्र रद्द
शहरात डॉ.झाकीर हुसेन उर्दू हायस्कूलसह साने गुरुजी माध्यमिक विद्यालय हे दहावी परीक्षेसाठी परीक्षा केंद्र आहे. दहावीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर झाले असतांना ऐनवेळी नवीन परीक्षा केंद्र शोधून त्या ठिकाणी परीक्षार्थींची व्यवस्था करण्याची जबाबदारी तालुका शिक्षण विभागावर आली आहे. गेल्यावर्षी दहावीच्या परीक्षेवेळी डॉ. झाकीर हुसेन उर्दू हायस्कूलच्या परीक्षा केंद्रावर कॉपी नियंत्रण मुक्त भरारी पथकास या केंद्रावर कॉपी संदर्भात गैरप्रकार आढळून आल्यामुळे संबंधित पथकाने सदरहू केंद्र बंद करण्या विषयीचा अभिप्राय नोंदविला होता. या अभिप्रायाची दखल घेत नाशिक येथील परीक्षा मंडळाने यावर्षी सदरचे केंद्र बंद करण्याचा निर्णय घेतला आहे व तसे आदेश जिल्हा माध्यमिक शिक्षण विभागाला देण्यात आले असून जिल्हा परीषद माध्यमिक शिक्षण विभागाने हे आदेश तालुका शिक्षण विभागाकडे पाठविले आहे. डॉ.झाकीर हुसेन उर्दू हायस्कूलमधील परीक्षा केंद्रावर सुमारे 550 परीक्षार्थी विद्यार्थी असतात. त्यानुसार या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी व या परीक्षा केंद्रावरील परीक्षार्थी विद्यार्थ्यांचे गैरसोय न होता त्यांची पर्यायी व्यवस्था करण्यासाठी तालुका शिक्षण विभागाने यावल शहराजवळील दहिगाव, सातोद, सांगवी येथील परीक्षा केंद्रांची पाहणी नुकतीच केल्याचे सांगण्यात आले.