विरोधी गटाचा आरोप ; प्रसिद्धी माध्यमांना दिले लेखी निवेदन
यावल- शहरात गेल्या काही महिन्यांपासून यावल शहरात दोन ते तीन दिवसाआड होणारा पाणीपुरवठा हा सत्ताधार्यांच्या निष्क्रियपणामुळे आता तर पाच ते सहा दिवस उलटूनही शहरात पाणीपुरवठा होत नसल्यामुळे नागरीकांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. सत्ताधार्यांच्या उदासीन धोरणामुळे व निष्क्रियतेमुळे नागरीकांना मनस्ताप सोसावा लागत असल्याबाबत विरोधी गटाच्या नगरसेवकांनी प्रसिद्धी माध्यमांना लेखी निवेदनाद्वारे कळवले आहे.
आवर्तनासाठी सत्ताधार्यांचे प्रयत्न अपूर्ण
यावल शहराला पाणीपुरवठा हा हतनुर धरणाच्या आवर्तनावर अवलंबून असून धरणातून पाटचारीद्वारे पाणी नगरपरीषदेच्या साठवण तलावात घेतले जाते व तेथून जलशुद्धी केंद्राकडून पाणी शहराला मिळते मात्र सद्यस्थितीत तलावाने तळ गाठला असून आवर्तन मिळण्यासाठी सत्ताधार्यांचे प्रयत्न अपुरे पडत आहे. तलावात 15 दिवस पुरेल इतका साठा शिल्लक असताना तेव्हाच आवर्तनासाठी प्रयत्न करणे आवश्यक होते मात्र नगराध्यक्ष व त्यांचा सत्ताधारी गट निष्क्रियतेमुळे व नियोजन शून्य कारभारामुळे आज यावल शहराला पाणीटंचाईस सामोरे जावे लागत आहे. नगरपरीषदेच्या 20 वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदाच भर हिवाळ्यात पाणीटंचाई निर्माण झाली आहे. हतनूर धरणात पाणीसाठा कमी असल्याचे कारण देऊन पाणीटंचाईचे समर्थन सत्ताधारी करत असतील तर हे यावल शहराचे दुर्दैव आहे. गेल्या सहा महिन्यांपूर्वी नगरपरीषदेच्या सर्वसाधारण सभेमध्ये शहरातील जुन्या विहिरी दुरुस्त करून पर्यायी व्यवस्था करण्याबाबत ठराव मंजूर करण्यात आला आहे मात्र नगराध्यक्ष व सत्ताधारी गटातील नगरसेवकांचा प्रशासनावर वचक नसल्याने शहराच्या पाणीपुरवठाच्या बट्ट्याबोळ झाला आहे. सत्ताधारी गटाचे हे अपयश आहे. प्रसिद्धीला दिलेल्या निवेदनावर नगरसेवक अतुल वसंतराव पाटील, राकेश मुरलीधर कोलते, शेख असलम नवी, रुक्माबाई भालेराव, देवयानी महाजन, पौर्णिमा फालक, नौशाद तडवी आदींच्या स्वाक्षर्या आहेत.