यावल शहरात गुरांची अवैध वाहतूक : दोघांना अटक

यावल : अंकलेश्वर-बर्‍हाणपूर राज्य मार्गावरील चोपडा नाक्याजवळ अवैधरीत्या गुरांची वाहतूक करणारे वाहन यावल पोलिसांनी जप्त करीत पाच म्हशींसह दोन रेड्यांची सुटका केली. या प्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

गोपनीय माहितीवरून कारवाई
अंकलेश्वर-बर्‍हाणपूर राज्य मार्गावरील सावदा येथील दोघे अवैधरीत्या गुरांची वाहतूक करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. हवालदार नरेंद्र बागुले, सिकंदर तडवी, निलेश वाघ यांच्या पथकाने चोपडा नाक्यावर नाकाबंदी लावल्यानंतर पिकअप वाहन (क्रमांक एम.एच. 04 जी.आर. 3638) आल्यानंतर त्यात गुरांची वाहतूक होत असल्याचे दिसून आले. संशयीत आरोपी यासीन शेख आमीर व वसीम शेख आमीर (दोघे रा.सावदा) यांना अटक करण्यात आली. पोलिस कर्मचारी गणी मिर्झा यांच्या फिर्यादीवरून संशयीतांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलिस उपनिरीक्षक सुनीता कोळपकर करीत आहे.