उत्सवाला शंभर वर्षांची परंपरा : यावल शहराला आले यात्रेेचे स्वरूप
यावल- शहरात पेहरन-ए-शरीफ उत्सवानिमित्त दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास मिरवणुकीला सुरुवात झाली. सुमारे 100 वर्षाहून जास्त वर्षाची परंपरा असलेल्या या उत्सवात सय्यदना गौसे आजम दस्तगीर यांचे पेहरन अर्थात तब्बरूक (पवित्र वस्त्र) चे दर्शन घेण्याकरीता राज्यासह परराज्यातील मुस्लीम बांधवांनी गर्दी केल्याने शहराला यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले आहे. यंदा उत्सवाचे आयोजन शहरातील डांगपुरा उत्सव समितीने केले आहे.
पवित्र वस्त्राची निघाली मिरवणूक
शहरातील नजमोद्यीन अमीरोद्यीन यांनी बगदाद येथील सय्यदना गौसे आजम दस्तगीर यांचे पेहरन आणले होते. त्यास तब्बरूक (पवित्र वस्त्र) असे म्हणतात. स्वातंत्र्यपूर्व काळापासुन येथे या पवित्र वस्त्राची सजविलेल्या डोलीतून शहरातून वाद्यवृंदाच्या गजरात धार्मीक गीत (नातेपाक) गात मिरवणूक काढण्याची प्रथा सुरू करण्यात आली होती ती आजही कायम आहे. मंगळवारी दुपारी निघालेल्या मिरवणुकीत पेहरन-ए-शरीफच्या डोलीखालून निघून अनेकांनी भाविकांनी मन्नत (मागणे) मागितली तर भाविकाने मागितलेले मागणे हमखास पूर्ण होते, अशी हिंदु-मुस्लीम भाविकांची श्रध्दा आहे.
उद्या कुस्त्यांची आमदंगल
उत्सवाच्या दुसर्या दिवशी बुधवारी दुपारी तीन वाजेला कुस्त्यांची आम दंगल होणार आहे. हडकाई नदीपात्रात होणार्या कुस्त्यांच्या दंगलीत बर्हाणपूर, मालेगाव, चाळीसगाव, पाचोरा, धुळ्यासह जिल्हयातील मल्ल येथे हजेरी लावतात. याकरीता मुस्ताक शे. हूसैन, रशीद हाजी शे. बशीर, रईस खान बिस्मिल्ला खान, रशीद अ. लतीफ मन्यार, सुफीयान मन्यार, रशीद कुरेशी, अलताफ शे. समद, मुख्तार शे. हनीफ, याकूब अली सैय्यद, शकील खान, अरशद नुर मोमीन परीश्रम घेत आहेत.