फडणवीस-राऊतांच्या भेटीमागे हे होते कारण; संजय राऊत यांचे स्पष्टीकरण

0

मुंबई: शिवसेनेने भाजपसोबतची २५ वर्षापासून असलेली मैत्री तोडत कॉंग्रेस-राष्ट्रवादीसोबत घरोबा करत महाविकास आघाडीची सत्ता स्थापन केली, त्यानंतर शिवसेना आणि भाजपात कमालीची कटुता निर्माण झाली. महाविकास आघाडीचे शिल्पकार म्हणून शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्याकडे पहिले जाते. युती तुटल्यानंतर माजी मुख्यमंत्री आणि संजय राऊत यांनी एकमेकांवर जहरी टीका केली. मात्र काल शनिवारी संजय राऊत आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात गुप्त भेट झाल्याची माहिती समोर आल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात एकच खळबळ उडाली. पुन्हा शिवसेना-भाजप एकत्र येतील अशी चर्चा सुरु झाली. महाराष्ट्रात मोठ्या राजकीय भूकंपाची तयारी सुरु झाल्याच्या चर्चा देखील रंगू लागल्या, मात्र यावर आज रविवारी स्वत: संजय राऊत यांनी स्पष्टीकरण दिले आहे.

आमच्या भेटीमध्ये गोपनीय असे काही नव्हते. गोपनीय भेट म्हणायला आम्ही काही बंकरमध्ये भेटलेलो नाही. या भेटीत सामना या वृत्तपत्राच्या मुलाखतीबाबत चर्चा झाली. बाकी गोपनीय म्हणायचे तर आम्ही गोपनीय पद्धतीने जेवलो, असा चिमटा राऊत यांनी काढला. आज सकाळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला, त्यानंतर या चर्चेवर आता पडदा पडणार आहे.

दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे एकमेकांना न भेटालयला आम्ही काही एकमेकांचे शत्रू नाही. महाराष्ट्राच्या राजकारणात वैचारिक वाद होतात पण वैयक्तिक वाद होत नाही. सत्ताधारी विरोधक भेटतच असतात. भाजपासोबत सत्तेत असताना मी शरद पवार यांना भेटायचो. आजही आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदींना आपले नेते मानतो, असे संजय राऊत म्हणाले.