मुंबई : ‘टॉयलेट : एक प्रेम कथा’ आणि ‘पॅडमॅन’सारख्या चित्रपटाच्या यशानंतर अक्षय कुमार पुन्हा एकदा सामाजिक विषयावर आधारित चित्रपटात झळकणार आहे. पॅडमॅनचे दिग्दर्शक आर. बाल्की यांच्या आगामी चित्रपटात अक्षय कुमार महत्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे. अक्षयसह या चित्रपटात विद्या बालन आणि निमरीत कौर यादेखील मुख्य भूमिकेत दिसणार आहेत
‘महिला मंडल’ असे या चित्रपटाचे नाव असणार असून भारताच्या मंगळयान मोहिमेत महिलांनी दिलेल्या महत्वपूर्ण योगदानावर हा चित्रपट आधारित असणार आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने तब्बल ११ वर्षांनी अक्षय कुमार आणि विद्या बालन एकत्र दिसणार आहेत. याआधी दोघांनी ‘हे बेबी’ या चित्रपटात एकत्र काम केले होते. ‘पॅडमॅन’सारखाच हाही चित्रपट यशस्वी होईल, अशी आशा वर्तविण्यात येत आहे. दरम्यान, अक्षय कुमार सध्या ‘हाऊसफुल ४’च्या चित्रीकरणामध्ये व्यस्त आहे. त्यानंतर ‘महिला मंडल’ चित्रपटाचे शूटिंग सुरु करण्यात येणार आहे.