…या लाचखोर अधिकार्याच्या घरात सापडले कोट्यवधींचे घबाड
एक कोटी 61 लाखांच्या मौल्यवान वस्तू जप्त : कारवाईने उडाली खळबळ
मुंबई : शिक्षण व प्रशिक्षण प्रादेशिक कार्यालयाचे सहसंचालक अनिल मदनजी जाधव (52) यांना पाच लाखांची लाच घेताना मंगळवार, 4 रोजी एसीबीच्या पथकाने अटक केली होती. अटकेनंतर एसीबीच्या पथकाने जाधव यांच्या घराची झडती घेतली असता त्यांच्या हाती मोठे घबाडच लागले आहे. कोट्यवधी रुपयांचे दागिने आणि रोकडसह एक कोटी 61 लाख 38 हजार 345 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती मुंबई एसीबीचे सहाय्यक पोलिस आयुक्त संजय पाटील यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
पाच लाखांच्या लाच मागणीनंतर कारवाई
एका शैक्षणिक अकॅडमीत भागीदार असलेल्या तक्रारदाराने आपल्या अकॅडमीत विविध कोर्सच्या मंजुरीसाठी त्यांनी शिक्षण व प्रादेशिक विभागाकडे अर्ज केला होता. यावेळी या मंजुरीसाठी अनिल जाधव यांनी त्यांच्याकडे पाच लाखांची लाच मागितली होती व एसीबीकडे तक्रार करण्यात आल्यानंतर 14 डिसेंबर 2021 रोजी लाच मागणी सिद्ध झाली होती. त्यानुसार सापळा रचून मंगळवार, 4 जानेवारी रोजी जाधव यांना अटक करण्यात आली होती.
घर झडतीत आढळले घबाड
एसीबीच्या अधिकार्यांनी अनिल जाधव यांच्या घराची झाडाझडती घेतली असता त्यांच्या घरुन कोट्यवधी रुपयांचं घबाड सापडलं आहे. एसीबीच्या अधिकृत माहितीनुसार, अनिल जाधव यांच्या घरातून एक कोटी 61 लाख 38 हजार 345 रुपयांची संपत्ती जप्त करण्यात आली. त्यात सोन्याची नाणी, बिस्कीटे व अन्य मौल्यवान वस्तूंसह 79 लाख 63 हजार 500 रुपयांचा ऐवज तर कार्यालयाच्या झडतीतून दोन लाख 28 हजार शंभर रुपयांची बेहिशोबी रोकड जप्त करण्यात आली. हा सापळा सहा.पोलिस अधीक्षक आबासाहेब पाटील, पोलिस निरीक्षक सुप्रिया नटे यांच्या पथकाने यशस्वी केला तर घर झडती सहा.पोलिस अधीक्षक प्रवीण लोखंडे, पोलिस निरीक्षक गायत्री जाधव आदींनी घेतली. ही कारवाई अपर पोलिस आयुक्त लखमी गौतम यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.