या विसंगतीचे करायचे काय?

0

राज्यातील महापालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुकीचे रणकंदन आता कुठे शांत झाले आहे. मुंबईत महापौर निवड झाली असून, इतरत्र अशा निवडी होऊ घातल्या आहेत. सारे कसे नित्याप्रमाणे सुरू झाले. आता 2019 पर्यंत राज्यात कोणतीही निवडणूक होण्याची शक्यता नाही. त्यामुळे किमान निवडणुकीचा विषय तरी बाजूला जाईल, असे वाटत होते. पण आजचे वर्तमान भविष्यातील रणकंदनाला खतपाणी घालू शकते. नाशिक शहरात अचानकच लागलेले गुजराती भाषेतील फलक त्याचा सांगावा घेऊन आले आहेत.

नाशिक महापालिकेत महाराष्ट्र नवनिर्माण सेना सत्ता राखणार की, भाजप व शिवसेना यांच्यापैकी कोणी सत्तेत जाऊन बसणार, यावर मध्यंतरी जोरदार चर्चा झडत होत्या. नाशिक महापालिकेत भाजपला पूर्ण बहुमत मिळाल्याने आता ती चर्चाही इतिहासजमा झाली. आता तेथे भाजप काय करणार, हा चर्चेचा विषय असायला हवा होता. पण शहरात काही भागांत व विशेषतः रामकुंडावर अचानकच गुजराती भाषेत लागलेले फलक सर्वांनाच धक्का देऊन गेले आहेत. एरवी अशा विषयावर चर्चाही होण्याचे कारण नव्हते. पण ज्या परिस्थितीत व वातावरणात हे फलक अचानक उभे राहिले आहेत. त्यामुळे ही चर्चा रंगणारच आहे. विसंगती जाणवते ती या अवकाशात. मुंबईत भाषक संघर्ष आता टोकदार बनताहेत. मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा डाव असल्याचा दावा केला जातो, त्याला हे भाषेचेही एक परिमाण आहेच. मुंबईत व विशेषतः अंधेरीपासून ते बोरिवलीपल्याडचे अनेक परिसर हे गुजरातीबहुल आहेत. तेथे मराठी, हिंदी, इंग्रजीबरोबरच गुजराती भाषेतील फलक लागलेले दिसतात. मुंबईत अन्य ठिकाणीही असे फलक दिसतात. त्यावर शिवसेना, मनसेने वेळोवेळी आक्षेपही घेतले आहेत. बोरिवलीसारख्या रेल्वेस्थानकावर गुजरातीतून उद्घोषणा केल्या जातात. त्यालाही आक्षेप घेतला जातो. परंतु, गुजरातीबहुल भागात येणार्‍या- जाणार्‍या प्रवाशांच्या सोयीसाठी अशा उद्घोषणा केल्या जातात, असे सरकारी छापाचे उत्तर दिले जाते. गुजरातेतील वापी ते बडोदा या विस्तीर्ण पट्ट्यात आणि अगदी अहमदाबादेतही मराठी भाषकांची संख्या मोठी आहे. तेथे मोठ्या संख्येने मराठी भाषकही जातात. पण त्यांच्या सोयीसाठी त्या स्थानकांवर मराठीतून उद्घोषणा केली जात नाही, हे का, या प्रश्‍नाचे उत्तर देण्याची तसदी कोणीच घेत नाही. एकास एक न्याय, तर दुसर्‍यास दुसरा, ही विसंगती नाही का?

प्रत्येक प्रांताची म्हणून एक भाषक ओळख असते. जगभर अशी ओळख कसोशीने जपली जाते. बाहेरून येणार्‍या पाहुण्यांची त्यामुळे गैरसोय होते, हे त्या मंडळींना माहिती नसते असे नाही, पण तरीही अशी ओळख जपण्यावर भर दिला जातो. त्याचे कारण फक्त भाषे नसते. भाषेमागे एक इतिहास असतो, एक संस्कृती असते आणि तिचे सातत्य राखणे, तो इतिहास, ती संस्कृती जगाला परिचित करून देणे, असे त्यामागचे उद्देश असतात. आपल्या गावी असे काही का नसते? नाशिकला रामकुंडावर पूर्वीही गुजराती भाषक येत होते. रामकुंडावर गुजरातीत फलक नसतानाही त्यांची गैरसोय होत नव्हती. असे फलक का नाहीत, असा प्रश्‍न कुणी करत नव्हते आणि तो लावा म्हणूनही कुणी मागणी केली नव्हती. मग अचानकच ही गरज का वाटू लागली, असा हा प्रश्‍न आहे आणि या प्रश्‍नाचे उत्तर सत्ताधारी भाजपला आज ना उद्या द्यावेच लागणार आहे. तसे ते न दिले गेल्यास भाजपच्या विश्‍वासार्हतेवरच प्रश्‍नचिन्ह उमटू शकते.

मुंबईत तर आता मराठी, हिंदी, इंग्रजी, गुजरातीसह उर्दू, भोजपुरी, तामीळ, कन्नड अशा विविध भाषांतील फलकही दिसतात. एकाच शहरात असे भाषिक संमेलन, जग वगैरे जाऊद्या, आपल्या भारत देशातही फारसे दिसत नाही. जगातल्या बहुतेक सर्व महानगरांत आता बहुभाषकांची बहुसंख्या असते. मात्र, म्हणून बहुभाषक फलक लागत नाहीत. तेथील स्थानिक स्वराज्य संस्था स्थानिक भाषा आणि प्रमाण भाषा म्हणजे इंग्रजीचा वापरच फलकांसाठी करते. फक्त मुंबईतच हे नियम का गुंडाळून ठेवले जातात, हे आजतागायत न उलगडलेलेे कोडे आहे. राज्यात सरकार कोणाचे आहे, हा प्रश्‍नच येथे गौण आहे. कोणत्याही पक्षाला आणि सरकारला यात विसंगती का जाणवत नाही? प्रश्‍न भाषक अस्मितेचा असतोच, पण त्याहीपेक्षा आपल्या सजगतेचाही अधिक असतो. मुंबईसह महाराष्ट्राची मागणी झाली, तीच मुळी मराठीच्या मुद्द्यावर. मग तीच मराठी मुंबईत का खुपते?

नाशिक महापालिका महाराष्ट्रात आहे आणि राज्य सरकारचे अनुदान या स्थानिक स्वराज्य संस्थेस मिळते, अशी ही संस्था रातोरात दुसर्‍याच भाषेतील फलक कशी लावू शकते? नाशकात फक्त गुजरातीच नव्हे, तर देशाच्या अन्य भागांतून आणि अगदी विदेशातूनही लोक येत असतात. त्यांना या गुजराती पाट्या वाचून नेमका कोणता बोध होणार आहे? उद्यो कोणी आपल्या भाषेतील फलक लावा म्हणून हट्ट धरला, तर तसे काही केले जाणार का?

विसंगती आहे ती या सगळ्या अवकाशात आणि तीच सरकारला गोत्यात आणणारी असू शकते. किमान याचे भान तरी सरकारातल्या धुरिणांनी ठेवायला काय हरकत आहे? भाषक वैशिष्ट्यांची, साधूसंतांच्या वैचारिक परंपरांनी समृद्ध झालेली आणि नव्या युगाचे आव्हान पेलण्याची क्षमता असलेली मराठी या परंपरांचे राजवस्त्र घालून सरकारदरबारी अक्षरशः भिकेचा कटोरा घेऊन कशी उभी आहे, याचे मर्मभेदी चित्रण तात्यासाहेब शिरवाडकरांनी स्वातंत्र्यदेवतेची विनवणीमध्ये केले आहे. अशा या तात्यासाहेबांच्याच नाशकात असे काही होणे, हीच मुळात केवढी विसंगती आहे. म्हणूनच प्रश्‍न पडतो, की या विसंगतीचे नेमके करायचे काय?

– गोपाळ जोशी
9922421535