या शोषणाला बुद्धिभ्रमिष्ट समाजच जबाबदार!

0

खरे तर देवाचा शोध घेण्यासाठी माणसे अशा संत आणि महंतांच्या नादीच का लागतात? भौतिक गरजा आणि कौटुंबीक सुखाच्या शोधासाठी ही माणसे वेड्यागत देव शोधत बसलेली असतात. मूळात नानाविध तापाने ती त्रस्त असतात, आणि त्यातून सुटका करण्यासाठी ती देवाचा धावा करत असतात. अशाप्रकारे त्यांच्या धावेला धावून येणारा कुणीही बाह्य देव नावाचा घटक अस्तित्वात नाही. तरीही तो आहे, असे सांगून कथित संत अन् महात्म्ये मंडळी कोट्यवधी लोकांना नादी लावतच आहेत. हिंदूच नव्हे तर सगळ्यात धर्मात हा बाजार भरलेला आहे. हा बाजार अंधश्रद्धेला खतपाणी घालतो. अंधश्रद्धेच्या फोफावलेल्या पिकावर या मंडळींची गुजराण होत असते. भक्त गरीब राहतात, बाबा, बुवा, संत-महात्म्ये गर्भश्रीमंत होत जातात. जोपर्यंत देवाच्या नावाने चालणारा हा बाजार उठविला जाणार नाही, तोपर्यंत गुरुमीत रामरहीम सिंगसारखे बुवा-बाबांची पैदास होतच राहणार आहे.

खरे तर युगप्रवर्तक स्वामी विवेकानंदांनी काय सांगितले होते, याचा विसर समाजाला पडला आहे. स्वामीजी म्हणाले होते, “स्वतःच्या बाहेर ईश्वराला शोधणे अशक्य आहे; कारण आपले शरीर हेच त्याचे खूप मोठे निवासस्थान व मंदीर आहे.“ ज्या समाजाला स्वतःच्या अस्तित्वाची जाणिव होत नाही, जो समाज आत्मभानाअभावी सैरभैर फिरतो अन् दुःख अन् वेदना मिटविण्यासाठी दगडा-धोंड्यातील देव शोधत बसतो, तो समाज खरे तर भ्रमिष्ट आणि मूर्खच म्हणायला हवा. असाच समाज गुरुमीत किंवा आसारामसारख्या भोंदूच्या नादी लागतो. वृक्ष तेथे छाया, अन् बुवा तेथे बाया असतातच. त्यामुळे भारतातील आणि भारताबाहेरील बहुतांश आश्रम अन् मठ हे स्त्रियांच्या लैंगिक शोषणाचे अड्डेच बनलेले आहेत. तेव्हा जोपर्यंत असले आश्रम आणि मठ सरकारी नियंत्रणाखाली येत नाहीत, तोपर्यंत हे शोषण सुरुच राहील. या भोंदूच्या मार्फत निव्वळ योनी किंवा शरीरशोषणच होत नाही. तर मी मंडळी समाजाचे वित्त, वेळ आणि मानसिक शोषणदेखील करत असतात. हा म्हणजे गंभीरतम असा अपराध आहे. अनेक असे बाबा आहेत, जे कवडीचेही धनी नव्हते, ते कालांतराने कोट्यवधीच्या मालमत्तेचे धनी बनलेत. त्यांच्या आश्रम किंवा मठात तरुण साध्वींचा असलेला वावर, अनेक स्त्रियांचा त्यांच्याकडे वारंवार होत असलेला संचार या बाबी अनेक कुप्रथांना जन्म घालतात.

पुरुषांसाठी वेश्यालये असतात, तसे काही महिलांसाठी हे मठ किंवा आश्रम हे शरीर संतुष्टीचे केंद्रच बनले आहेत. या बाबांची सेवा हीच ईश्वरसेवा अशी सरळसरळ व्याख्याच या अंधश्रद्ध भक्तांची झालेली असते. त्यामुळे आपली मुलगी, पत्नी किंवा बहीण ही बुवा-बाबा-महाराजांकडे जाऊन काय करते? याबाबत कुणाच्याही मनात काहीही शंका येत नाही. अशी शंका न येण्यासाठी मेंदूतील विचारचक्र सुरुळीत सुरु असावे लागते. तो मेंदू तर्क करण्यासाठी सक्षम असावा लागतो. या बुवा-बाबांनी भक्तांचा मेंदू कुजविलेला असतो. त्याला भ्रमिष्ट केलेले असते. त्याच्यावर स्वतःच्या अवतारीत्वाची छाप सोडलेली असते. त्यामुळे ही माणसे तर्कहीन झालेली असतात. त्यामुळेच ती स्त्रीशोषणासह विविध शोषणाला सहजपणे बळी पडत जातात.

ईश्वरसेवेबद्दल स्वामी विवेकानंद फार मार्मिक बोलले होते, देशातील दारिद्रय व अज्ञात घालविणे म्हणजेच ईश्वरसेवा होय! परंतु, यापैकी कुणीही बाबा समाजातील दारिद्रय आणि अज्ञात घालविण्यासाठी प्रयत्न करत नाहीत. कारण, तसे प्रयत्न केले तर खरोखर दारिद्रय, अज्ञात दूर होईल; परिणामस्वरूप या बाबालोकांची दुकानदारी बंद होईल. धर्माच्याआड बुरखा खालून चालणारा शोषणाचा उद्योग बंद होईल. म्हणून, अज्ञान कायम राहिले पाहिजेत, दारिद्रय कायम राहिले पाहिजेत, हीच या बाबांची प्रमुख अभिलाषा असते. बरं, हे बाबालोकं काही हिंदू धर्म म्हणून ओळखल्या जातात त्याच समाजव्यवस्थेतच आहेत, असे नाही. ती सर्वच धर्म आणि पंथांच्या नावाने जगत असतात. वेगवेगळ्या नावाने ती शोषणाचा धंदा मांडून बसली आहेत. गॉड, अल्लाह किंवा ईश्वराच्यानावाने ती समाजाचे शोषण करत असतात, स्त्रियांचे शोषण करत असतात. या मंडळींचा हा धंदा बंद पाडण्यासाठी समाजातूनच आता कुणी तरी पुढे यायला हवे. तसे धाडस डेरा सच्चा सौदा या आश्रमातील दोन साध्वींनी दाखविले. आम्ही त्यांच्या या धाडसाचे कौतुक करतो. अगदी निडरपणे त्या अशा सामोरे आल्या नसत्या तर गुरुमीतसारखा लिंगपिसाट आज गजाआड गेला नसता. त्याने केवळ मुली किंवा स्त्रियाच नासविल्या नाही तर त्यांनी हिंदू समाजव्यवस्था आणि हिंदू धारणेलाही बट्टा लावला. अशा लोकांना खरे तर फासावर लटकविणे हाच काय तो योग्य न्याय ठरला असता, परंतु आता न्यायदेवतेने त्याला दोन दशके कारागृहात डांबलेच आहे तर त्याही न्यायावर आम्ही समाधानी आहोत.

एरवी राजेशाही जीवन जगणारा आणि कालपर्यंत अगदी देशाच्या राज्यघटनेलाही आव्हान देणारा गुरुमीत न्यायाधीशांसमोर मात्र ढसाढसा रडला. फरशीवर बसून तो दयेची याचना करत होता. त्याच्या वकिलांनीही विविध तर्क आणि युक्तिवाद करत किमानपक्षी त्याची शिक्षा तरी कमी करण्यासाठी आर्जव घातले, तरीही न्यायदेवता आपल्या भूमिकेवर ठाम राहिली. न्यायदेवतेचे हे निकालपत्र खर्‍याअर्थाने ऐतिहासिकच म्हणावे लागेल. ज्या बाबा अन् बुवांचे वर्तन आजही गुरुमीतसारखे असेल त्यांनी आता सुधारावे. अन्यथा, या देशातील कायदा तुम्हाला माफ करणार नाही, हे लक्षात घ्यावे.

देवाचा शोध व्यर्थ का करिता।
प्रत्यक्ष असता तुम्हा पुढे॥
या इकडे तुम्ही पहा तो नयनी।
नटला रुपांनी दुःखितांच्या॥

अशाप्रकारे विदर्भातील मानवहितकारी संत शुकदास महाराजांनी देव कुठे आहे, या प्रश्नाचे उत्तर दिले आहे. स्वामी विवेकानंद यांनीही यापेक्षा वेगळे तत्वज्ञान सांगितले नाही. संत तुकाराम महाराज यांनीही संत आणि देव यांना ओळखण्याची खूण सांगितली होती. तुकोबा म्हणाले होते,

जे का रंजले गांजले।
त्यासी म्हणजे जो आपुले॥
तोचि साधू ओळखावा।
देव तेथेंचि जाणावा॥

तर तीर्थी धोंडापाणी देव रोकडा सज्जनी, असे सांगत दीन-दुबळे, अनाथ-अपंगांची सेवा करणारे थोरसंत गाडगेबाबा हे तर देवळात जाऊ नका, मूर्तिपूजा करू नका, असे पोटतिडकीने समाजाला सांगत होते. खरे संत आणि समाजसुधाकरक काय सांगत होते, याकडे समाजाने दुर्लक्ष केल्यानेच समाज गुरुमीतसारख्या दृष्ट, भामट्यांच्या शोषणाला बळी पडत आहे. आता तरी या घटनेतून समाज काही बोध घेईल, अशी अपेक्षा ठेवू या!!