मुंबई । मुंबई महापालिकेत शिवसेना-भाजप युतीसंदर्भात चर्चेला अखेर मुहूर्त मिळाला आहे. शिवसेना-भाजपची पहिली बैठक आज होणार आहे. सुत्रांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. बैठकीला शिवसेनेतर्फे अनिल परब आणि अनिल देसाई उपस्थित राहणार आहेत, तर भाजपकडून आशिष शेलार आणि विनोद तावडे चर्चा करतील. या बैठकीतून कोणता निर्णय निघणार याकडे सर्वांचंच लक्ष लागून राहिले आहे. भाजपला 105 जागा हव्या आहेत परंतू शिवसेनेचा 70 पेक्षा जास्त जागा सोडण्यास नकार आहे. स्वबळाच्या वल्गनांना पुर्णविराम देत चर्चेच्या पहिल्या फेरीसाठी दोन्हीबाजूचे नेते आज एकत्र येणार आहेत. अंतिम निर्णय मात्र मुख्यमंत्री देवद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे हेच घेणर आहेत.
कार्यकर्ते स्वतंत्र लढण्यास इच्छुक
विधानसभा निवडणुकीत युती तुटल्यामुळे शिवसेना व भाजपच्या अनेक दुसर्या फळीतील नेत्यांना तिकिटे मिळाले होती. अर्थात आजवर हे नेते वर्षानुवर्षे वाट पाहत असले तरी युती तुटल्याशिवाय त्यांना संधी मिळाली नव्हती. या पार्श्वभूमिवर महापालिका निवडणुकांमध्येही स्वतंत्र लढावे असा दोन्ही बाजूंच्या इच्छुकांमध्ये सुर आहे. असे झाल्यास अनेक नवख्या चेहर्यांना उमेदवारी मिळू शकते. यामुळे शक्यतो युती न करता स्वतंत्र लढावे अशी त्यांची इच्छा आहे. मात्र वरिष्ठ पातळीवरून असा निर्णय झाल्यास मात्र त्यांचा विरस होणार आहे.
दोन्ही बाजूने युतीविषयी उत्सुकता
शिवसेना आणि भाजपने युतीबाबत निर्णय घेण्यापूर्वी स्वतंत्रपणे सर्वेक्षण केले आहे. शिवसेनेच्या सर्व्हेनुसार युती केल्यास पक्षाचे नुकसान होण्याची शक्यता आहे, तर स्वबळावर लढल्यास 30 ते 40 जास्त जागा मिळण्याची शक्यता समोर आली आहे. डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात हा सर्व्हे करण्यात आला होता. भाजप स्वबळावर लढल्यास अधिक जागा मिळण्याचा अंदाज भाजपच्या सर्वेक्षणात होता. स्वबळावर लढल्यास शंभरच्या आसपास जागा मिळतील असा निष्कर्ष काढण्यात आला आहे. अगदी कमीतकमी म्हणजे 85 जागा तरी निश्चित मिळवता येतील, अशी खात्री भाजपच्या नेत्यांना वाटत आहे. एकीकडे नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकांत वाढलेल्या ताकदीमुळे भाजप कार्यकर्ते आणि नेत्यांचाही निवडणूक स्वबळावर लढवण्याकडे कल आहे. शिवसेनेपुढे नमते घेऊन 100 ते 105 जागा पदरात पाडून घेण्यापेक्षा स्वबळावर लढून निवडणूक निकालानुसार सत्तेसाठीची पुढील रणनीती आखण्याचा मार्ग अधिक योग्य असल्याचे मत काही भाजप नेत्यांचे आहे. त्यामुळे युतीतील जागावाटपात शिवसेनेचा वरचष्माही भाजपला सहन करावा लागणार नाही. तर दुसरीकडे शिवसेनेनेही युतीबाबत निर्णय घेण्यापूर्वी स्वतंत्रपणे सर्वेक्षण केले आहे. शिवसेनेच्या सर्व्हेनुसार युती केल्यास पक्षाचे नुकसान होण्याची शक्यता आहे, तर स्वबळावर लढल्यास 30 ते 40 जास्त जागा मिळण्याची शक्यता समोर आली आहे. त्यामुळे युतीसोबत उगीच फरफटत जाणार नसल्याची भूमिका शिवसेनेने स्पष्ट केली आहे.
युती तुटल्यास फायदा काँग्रेसला होणार
मात्र स्वबळावर लढल्यास काँग्रेसही यशापासून दूर नाही. युती तुटल्यास त्याचा फायदा काँग्रेसच्या मिळणार्या अधिक जागांतून काँग्रेसला सहज होईल हे भाजप सेनेला ठाऊक असल्याने युतीचा सावध पवित्रा अवलंबला जात आहे आणि त्याची पहिली बैठक आज होणार आहे. तेव्हा सेना भाजपमध्ये होणार्या या बैठकीत काही सकारत्मक बोलणी होतात का याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.
फोडाफोडीच्या राजकारणाला वेग
युतीचे काय होईल माहीत नाही परंतू आपला पक्ष भक्कम होत चालला आहे हे दाखवण्याची स्पर्धा दोन्ही पक्षात लागली आहे. भाजपने एका पाठोपाठ एक आमदार खासदारांचे प्रवेश पक्षात घडवून आणण्यास सुरूवात केली आहे. माजी ग्रामविकास राज्यमंत्री राष्ट्रवादीचे माजी आमदार बदामराव पंडित यांचाही उद्या मंगळवारी शिवसेनेमध्ये प्रवेश होणार आहे. तर भाजपने सातारचे खासदार उदयनमहाराज भोसले यांच्या पक्षप्रवेशाची घाई सुरू केली आहे.
6 मार्चला मराठा क्रांती मोर्चा
मुंबई । मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून महाराष्ट्रभर निघालेल्या मोर्चांचे अंतीम शक्तीप्रदर्शन म्हणून जो मुंबई शहारात 31 तारखेला महामोर्चा निघणार होता तो पुढे ढकलण्यात आला असून याचे 6 मार्चला आयोजन करण्यात आले आहे. नवीन तारीख ठरवण्यासाठी रविवारी वडाळा येथील भारतीय क्रीडा मंदिर येथे एक बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला सर्व जिल्ह्याचे प्रतिनिधी उपस्थीत होते. हा मोर्चा 23 मार्चला घ्यावा, असा मुंबईतल्या पदाधिकार्यांचा आग्रह होता. मात्र बीड, लातूर, औरंगाबाद आणि परभणी या चार जिल्ह्यांच्या प्रतिनिधींनी याला विरोध दर्शविला. यानंतर अखेर 6 मार्च रोजी मोर्चा काढण्यावर एकमत झाले.