शिक्रापूर । युथ पार्लमेंट चॅम्पियन स्पर्धेतून शालेय विद्यार्थ्यांना सामाजिक प्रश्नांची जाणीव होते. या माध्यमातून विद्यार्थ्यांचा व्यक्तिगत विकास होत असल्याचे मत शिक्रापूर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक रमेश गलांडे यांनी व्यक्त केले.शिक्रापूर पोलिस स्टेशनच्या वतीने विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांच्या संकल्पनेतून युथ पार्लमेंट चॅम्पियन 2017 या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. आठवी ते बारावी तसेच वरिष्ठ महाविद्यालयांसाठी आयोजित ही स्पर्धा तळेगाव ढमढेरे येथील साहेबराव शंकरराव ढमढेरे येथे पार पडली.
मुलांना मिळाले व्यासपीठ
मुलांना मत व्यक्त करण्यासाठी या माध्यमातून व्यासपीठ मिळाले आहे. मुलांना त्यांच्या प्रश्नांची जाणीव होऊन त्यामधून मार्ग काढण्याची संधी मिळावी, तसेच त्यांना पोलिसांच्या कामाची माहिती मिळावी, असा या मागील हेतू असल्याचे गलांडे यांनी यावेळी सांगितले. रमेश गलांडे, अतुल भोसले, अरविंद ढमढेरे, महेश ढमढेरे, डॉ. प्रदीप पाटील, डॉ. संदीप सांगळे, अनिल जगताप, योगेश नागरगोजे, महेंद्र शिंदे, नामदेव भोइटे, राजेंद्र भगत, नानासाहेब गावडे आदी मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते.
विजेत्यांचा गौरव
विजेत्या सर्व संघाला शिक्रापूर पोलिस स्टेशनच्या वतीने सन्मानचिन्ह, प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. जिल्हा पातळीवर होणार्या स्पर्धेसाठी त्यांची निवड करण्यात आली आहे. सदर स्पर्धेचे पर्यवेक्षक म्हणून विजय अंधारे व डॉ. ईश्वर पवार यांनी काम पहिले तर सदर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी पोलिस नाईक अनिल जगताप यांनी विशेष परिश्रम घेतले. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नानासाहेब गावडे तर शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक महेश ढमढेरे यांनी आभार मानले.
शाळांनी मारली बाजी
आठवी ते बारावी गटातून निमगाव म्हाळुंगी येथील विद्या विकास मंदिर, कासारीतील हिराबाई गोपाळराव गायकवाड विद्यालय, तळेगाव ढमढेरेमधील समाजभूषण संभाजीराव भूजवळ विद्यालय, विद्याधाम प्रशाला शिक्रापूर, विद्या विकास मंदिर करंदी यांनी तर महाविद्यालयीन गटातून साहेबराव शंकरराव ढमढेरे विद्यालय, संभाजी राजे विद्या संकुल, अलआमिन कॉलेज कोरेगाव भिमा यांनी सहभाग घेतला होता. यापैकी विद्याधाम प्रशालेने डॉल्बीमुक्त अभियान या विषयावर विचार मांडून प्रथम क्रमांक पटकावला. विद्या विकास मंदिरच्या विद्यार्थ्यांनी छेडछाड या विषयावर विचार व्यक्त करून द्वितीय तर संभाजीराजे विद्या संकुलातील विद्यार्थ्यांनी धार्मिक तेढ या विषयावर मत व्यक्त करून उपस्थितांची मने जिंकत तृतीय क्रमांक मिळविला.