युद्धाचे ढग गडद; दोन आठवड्यांत युद्ध शक्य!

0

बीजिंग : डोकलामचा मुद्दा प्रतिष्ठेचा करुन चीन येत्या दोन आठवड्यात भारतावर युद्ध लादेल, अशी बातमी तज्ज्ञांच्या मतांचा आधार घेऊन ग्लोबल टाइम्स या वृत्तपत्राने दिली आहे. रस्ते बांधणीचे निमित्त करुन चीन भूतानचा भाग असलेले डोकलाम गिळंकृत करण्याच्या प्रयत्नात आहे. या प्रयत्नांना विरोध करण्यासाठी भूतानने मदत मागितल्यामुळे डोकलाममध्ये भारताचे सैनिक उभे ठाकले आहे. चीन वारंवार युद्धाच्या धमक्या देत असताना भारत ठामपणे भूतानच्या डोकलामचे रक्षण करत आहे. भारत मागे हटत नसल्याचे पाहून अस्वस्थ झालेला चीन मर्यादीत स्वरुपाचे युद्ध करुन भारतीय सैनिकांना मागे ढकलत डोकलाम ताब्यात घेण्याचा विचार करत आहे. सध्या डोकलाम येथे भारत आणि चीनचे सैनिक आमने-सामने उभे आहेत. चीनच्या शक्तिप्रदर्शन आणि धमक्यांना घाबरुन मागे हटणार नाही पण चर्चेतून मार्ग काढला जाणार असेल तर चर्चा करू, अशी स्पष्ट भूमिका भारताने घेतली आहे. मात्र भारतीय सैनिक मागे हटत नसल्याचे पाहून अस्वस्थ झालेला चीन आता लष्करी बळावर डोकलाम ताब्यात घेण्याच्या प्रयत्नात आहे.

चीन करू शकते लष्करी ऑपरेशन
चीनमधील आंतरराष्ट्रीय विषयांवरचे संशोधक हु जियोंग म्हणाले की, मागील चीन भारतीय लष्कराला चीनच्या भूभागात आणखी काही काळानंतर सहन करू शकणार नाही. दोन आठवड्यात चीन लष्करी ऑपरेशन करू शकते. भारतीय सैनिकांना कैदेत ठेवणे किंवा त्यांना माघार घेण्यास भाग पाडणे, हा चीनच्या संभाव्य ऑपरेशनचा हेतू असेल. त्याचबरोबर चीनच्या विदेश मंत्रालयाकडूनही या कारवाईपूर्वी भारताला याबाबतची माहिती दिली जाईल, असे ग्लोबल टाइम्सने हु जियोंग यांच्या हवाल्याने म्हटले आहे.

चिनी सैन्याचा तिबेटमध्ये युद्धाभ्यास
शुक्रवारी चीनच्या सैन्याने तिबेट येथे युद्धाभ्यास केला. पहाटे 4 वाजता हा युद्धाभ्यास सुरू झाला होता. यामध्ये शत्रूपक्षाच्या ठिकाणांवर कब्जा करण्याचा सराव करण्यात आला होता, असे वृत्त चीनमधील वृत्तवाहिनीने दिले आहे. मागील 24 तासांत चीनच्या विदेश मंत्रालय, संरक्षण मंत्रालय, भारतातील चीनचा दुतावास आणि पीपल्स डेलीकडून सातत्याने भारताला धमकी दिली जात आहे. आता तर चीनचे सरकारी वृत्तपत्र असलेल्या ग्लोबल टाइम्सने भारतीय पंतप्रधानांनाही लक्ष्य करत धमकाविण्यास सुरवात केली आहे. ग्लोबल टाइम्सने म्हटले आहे की, मोदी आमच्याबद्दल कडक भूमिका घेऊन आपल्या नागरिकांच्या भविष्यासोबत खेळ करत आहे. ते भारताला युद्धाच्या खाईत लोटत आहेत. मोदींना पीपल्स लिबरेशन आर्मीच्या ताकदीचा अंदाज असला पाहिजे, आम्ही डोकलाममधील भारतीय सैन्याला नेस्तनाबूत करु शकतो.

संवादातून तोडगा निघू शकतो : मोदी
जगभरातील समुदायांमध्ये मतभेद आणि देश आणि समाजांमध्ये संघर्ष निर्माण करणार्‍या धार्मिक रुढी आणि पूर्वग्रह यांना केवळ संवादाच्या माध्यमातूनच दूर करता येऊ शकते. एकमेकांशी जोडलेले आणि एकमेकांवर अवलंबून असलेले 21 व्या शतकातील हे जग सध्या दहशतवाद ते वातावरण बदल आदी समस्यांशी झगडत आहे. त्यावर संवाद आणि चर्चेच्या माध्यमातूनच तोडगा काढता येऊ शकतो. हीच आशियाची प्राचीन परंपरा आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका कार्यक्रमात शनिवारी केले. या वक्तव्यातून मोदी यांनी चीनला अप्रत्यक्ष संदेशच दिला.