युध्दासाठी देशाकडे शस्त्रसज्जता

0

रावेर। आपल्या देशाच्या शेजारी असलेले चिन व पाकिस्तान सिमेवर नेहमी कुरापती काढत असले तरी या दोन्ही शत्रू राष्ट्रांशी एकाच वेळी युद्द लढण्यासाठी आवश्यक क्षेपणास्त्र व अण्वस्त्र तसेच शस्त्रसज्जता भारताकडे असल्याचे प्रतिपादन संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी केले. ते पाल येथील वनविभागाच्या विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की, काश्मीर खोर्‍यातील काही तरुणांना पाकिस्तान दिशाहिन करुन दगडफेकीसाठी प्रवृत्त करीत आहे. यासाठी शेजारील देश त्या तरुणांना पैशांची रसद पुरवित आहे. परंतु येत्या वर्षभरात हे सर्व पैशांची रसद कायद्याने बंद करुन विकास प्रवाहात तरुणांना आणण्यासाठी प्रयत्न करु असे सांगितले.

पॅलेटगनवर नविन पर्याय उपलब्ध करुन देणार
काश्मिर खोर्‍यात सुरक्षा दलावर दररोज समाजकंटक दगडफेक करीत असतात. त्यामुळे सुरक्षा रक्षक मोठ्या प्रमाणावर जखमी होत आहे. पॅलेट गणमुळे या समाजकंटकांवर वेळीच नियंत्रण मिळविता येत होते. मात्र केंद्र शासनाने पॅलेट गनवर बंदी घातली असून यावर सुरक्षा दलाला नविन पर्याय उपलब्ध करुन देण्यात येईल असे त्यांनी सांगितले. यावेळी माजी मंत्री एकनाथराव खडसे, खासदार रक्षा खडसे, आमदार हरिभाऊ जावळे, जिल्हाध्यक्ष उदय वाघ, माजी शिक्षण सभापती सुरेश धनके, जिल्हा परिषद अध्यक्षा उज्वला पाटील, उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन उपस्थित होते.

आदिवासींचा विकास साधला
सरकार आदीवासी, गरिब लोकांसाठी विविध योजना राबवित आहे. या योजना थेट त्यांचा पर्यंत पोहचविण्याचे काम होत आहे. समाजातील शेवटच्या घटकाचा विकास करुन त्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांनी केले. स्व. पंडित दिनदयाल उपाध्याय जन्मशताब्दी वर्ष व केंद्र सरकारला तीन वर्षे पुर्ण झाल्याबद्दल आदीवासी वंचित मेळावा पाल येथे घेण्यात आला. यावेळी ते बोलत होते.
या मेळाव्यास माजी मंत्री एकनाथराव खडसे, खासदार रक्षा खडसे, खासदार ए.टी. पाटील, माजी खासदार डॉ. गुणवंतराव सरोदे, जिल्हाध्यक्ष उदय वाघ, जिल्हा परिषद अध्यक्षा उज्वला पाटील, उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन, माजी शिक्षण सभापती सुरेश धनके, जिल्हा उपाध्यक्ष पद्माकर महाजन, मिलींद वायकोळे, पंचायत समिती सभापती माधुरी नेमाडे, उपसभापती अनिता चौधरी आदी उपस्थित होते.

वृक्षदिंडीचा केला समारोप
वनविभागाच्या 50 कोटी वृक्षलागवड या महत्वाकांक्षी उपक्रमाचा भाग म्हणून संरक्षण राज्यमंत्री डॉ. भामरे यांच्या उपस्थितीत वृक्षदिंडी काढण्यात आली. वृक्षारोपण करुन या दिंडीचा समारोप करण्यात आला. यावेळी उपवनसंरक्षक संजयकुमार दहिवले, वनक्षेत्रपाल आर.जी. राणे, पी.डी. सोनवणे यांसह वनविभागाचे कर्मचारी व स्थानिक नागरीक उपस्थित होते. पाल येथे झालेल्या मेळाव्याचा योग्यरित्या प्रचार, प्रसार करण्यास आमदार जावळे अपयशी ठरले आहे. आदिवासी बांधवांनी या मेळाव्याकडे पाठ फिरविल्याचे दिसून आले.